राहुरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव : राहुरी शहरातील श्री बुवासिंद बाबा तालीम येथे आज (बुधवार) दुपारच्या सुमारास अज्ञात इसमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात श्री बुवासिंद बाबा तालीम संघ नाव असलेली तालीम आहे. त्या ठिकाणी बजरंग बली यांची मुर्ती असून शेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. आज दि. 26 (बुधवार) रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान अज्ञात इसमाने तालीममध्ये जावून तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास काळा रंग लावून विटंबना केली. काही वेळाने तरूण तालीममध्ये गेले असता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे लक्षात आले. काही वेळातच शेकडो शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा निषेध व्यक्त करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या.
घटनेची माहिती मिळताच, प्रातांधिकारी किरण सावंत, तहसीलदार नामदेव पाटील, यांच्यासह श्रीरामपुर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, हवालदार अशोक शिंदे, सुरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, आजिनाथ पाखरे, सतिष कुर्हाडे, राहुल यादव, नदिम शेख आदि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त झालेल्या शेकडो शिवप्रेमींनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर शिवप्रेमींनी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
यावेळी आ. शिवाजीराव कर्डिले, बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे, चाचा तनपुरे, हर्ष तनपुरे, माजी नगरसेवक नंदु तनपुरे यांनी पोलीस प्रशासनाला आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी केली. जवळपास तासभर चाललेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे नगर-मनमाड महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे राहुरी शहर बंद ठेवण्यात आले असून शहरात तणावपुर्ण शांतता आहे. तसेच दंगल नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी संबंधित पोलीस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेऊन आरोपीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. या घटनेमुळे उद्या (गुरूवार) रोजी राहुरी शहर बंद ठेवण्याचा निर्णय शिवप्रेमींनी घेतला आहे
राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना शिवप्रेमींकडून नगर-मनमाड महामार्गावर आंदोलन, उद्या राहुरी शहर बंद ठेवण्याचा शिवप्रेमींचा निर्णय

0Share
Leave a reply