राहुरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव : राहुरी हा शांतता प्रिय तालूका आहे, बाहेरचे लोक येथे येऊन जातीवादाला खतपाणी घालतात. प्रशासनाने प्रथम त्यांचा बंदोबस्त करावा. प्रशासनाने दबावाखाली काम करु नये, आरोपींची नावे जाहीर करावी. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणारे आरोपी कोणत्याही जाती धर्माचे असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहीजे. अशी मागणी राहुरी येथे प्रशासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आली.
काल दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नामदेव पाटील होते. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, मुळा प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक अय्युब पठाण, मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे, बाळासाहेब उंडे, सुरज शिंदे, प्रसाद बानकर, निलेश जगधने, अरुण साळवे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
२६ मार्च रोजी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली होती, त्यानंतर रस्ता रोको आंदोलन झाले. त्यात पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ झाली. त्यावर कारवाई का झाली नाही. घटनेच्या दिवशी पोलिसांच्या समक्ष एका देवस्थानाच्या कळसावरील झेंडा बदलला. त्याचे व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारीत झाले. तो आरोपी माहित असताना अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पोलीस खाते कुणाच्या दबावाखाली काम करीत आहे. असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.
यावेळी देवेंद्र लांबे म्हणाले कि, राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याची विटंबना गंभीर बाब आहे. पोलिसांनी दोन दिवसांचा वेळ मागितला होता. पाच दिवस उलटले, आरोपींचा शोध लागला नाही. तपासात प्रगती नाही, राहुरीकरांचा संयम सुटत आहे. आणखी पाच दिवस घ्यावेत. येत्या पाच एप्रिल पर्यंत आरोपीला अटक करावी किंवा तपास सीआयडीकडे सोपवावा. अन्यथा सकल मराठा समाज, मराठा एकीकरण समिती, मराठा क्रांती मोर्चातर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देवेंद्र लांबे यांनी दिला.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले कि, राहुरी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा व तांत्रिक विश्लेषण पथक असा त्रिस्तरीय तपास सुरू आहे. घटना संवेदनशील आहे, ठोस पुरावे असल्या शिवाय आरोपीला अटक करता येत नाही. तपासात आत्तापर्यंत अपयश आल्याचे मान्य आहे. जनतेच्या सहकार्याची गरज आहे. कुणाकडे ठोस माहिती, पुरावे असल्यास द्यावेत. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणावर आरोपीचा तपास वेगात सुरू आहे. आतापर्यंत १९ जणांची चौकशी केली आहे. तसेच शेकडो जणांची चौकशी केली जाणार आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल. मात्र नागरिकांनी शांतता व संयम बाळगावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे, भाजपचे अमोल भनगडे, शिवसेनेचे सचिन म्हसे, राष्ट्रवादीचे संतोष आघाव, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, आर. आर. तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, संतोषकुमार लोढा, कांता तनपुरे, गणेश खैरे उपस्थित होते.
Leave a reply