विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळीढोकेश्वर भागातील तलाव गाळात रुतल्यामुळे सिंचनक्षेत्र कमालीचे घटले आहे. जिल्हा प्रशासनाने टाकळी ढोकेश्वर परिसरात राज्य शासनाकडून राबविल्या जाणारी गाळयुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
टाकळी ढोकेश्वर भागात साधारण नऊ पाझर तलाव आहेत. तलावाच्या निर्मितीपासून त्या पैकी एक ते दोन तलावातील गाळ काढण्याचे काम लोकसहभागातून आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून काही प्रमाणात झाले होते. पण तेही काम अपूर्ण असल्याने सर्वच तलाव गाळात रुतले आहेत. गाळामुळे तलावाची पाणी साठवण क्षमताही घटली आहे. अर्थातच भिजवण क्षेत्र देखील कमालीचे घटले आहे. निवडुंगेवाडी पाझर तलावावर अंदाजे काही हेक्टर जमीन भिजवण्याची क्षमता होती. तलाव गाळात रुतल्याने सध्या तलावात पाणी नसल्याने केवळ गाळच आहे.
निवडुंगेवाडी पाझर तलावासह इतर तलावांची देखील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. चांगला पाऊस पडला आणि तलाव भरले तरच शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू, हरभरा, उन्हाळी कांदा वाटाणा ही पिके घेता येतात. अन्यथा खरीप हंगामातील एकाच पिकावर समाधान मानावे लागते. परिणामी त्या भागातील शेतकरी सदानकदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतो. बारमाही सिंचन व्यवस्थेसाठी लोकप्रतिनिधींची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. राज्य शासनाने गाळयुक्त धरण व गाळयुक्त शेती ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचे ठरविले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून तलावातील गाळ काढून गाळमुक्त धरण करून निघालेला गाळ शेतात टाकून गाळ युक्त शेती केली जात आहे. त्याशिवाय ओढे नाले सरळीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. जिल्हाभरात ही योजना शक्तीने राबवल्या जात आहे.
जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरात या योजनेबद्दल प्रशासनाकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून कुठलीही वाच्यता केली जात नसल्याने या योजनेपासून टाकळी ढोकेश्वर परिसर हा वंचित राहणार का? अशी शेतकऱ्यांना धास्ती वाटत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शेती ही महत्त्वाकांक्षी योजना टाकळी ढोकेश्वर परिसरात राबवून गाळत रुतलेले सगळेच पाझर तलाव गाळमुक्त करावेत, नदी,ओढे नाल्यांचे सरळीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांतून पुढे आली आहे.
टाकळी ढोकेश्वर परिसरात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्याची गरज, ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी

0Share
Leave a reply