प्रतिनिधी किशोर खामगळ : मुंबई – नवाब मलिक हे राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. आज बुधवार,दि.23 सकाळी ईडीने त्यांना चौकशीसाठी नेण्याआधी कोणतीही नोटीस पाठवली नाही. मलिक यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिक पारदर्शकरीत्या चौकशीला सहकार्य करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर दिली.
या प्रकरणावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, या चौकशीचे कोणतेही आश्चर्य वाटत नाही. ट्विटरद्वारे अनेक लोक अमूक-तमूक नेत्याला अटक होण्याचे धमकीवजा ट्विट करत असतात, अशी टीका देखील त्यांनी विरोधकांवर केली. केंद्र सरकारच्या सत्तेच्या विरोधात देशात जो जो विरोधक आवाज उचलतो, त्याच्यावर ईडी चौकशी अथवा अनेकवेळा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. ज्यावेळी विरोधात कुणी बोलत असते, तेव्हाच या नोटीस आणि चौकशी होत असतात. मात्र नेत्यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर अशा नोटीसा विरघळून जातात. या सर्व गोष्टी संसदेत मांडल्याचेही खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाजपचे काही लोक ट्विटरवरून चौकशीच्या धमक्या देतात यावरही खासदार सुळे यांनी भाजपवर ताशेरे ओढले. भाजपच ईडी चालवत असेल अथवा भाजप आणि ईडीचे अध्यक्ष एकच असतील किंवा भाजपाने स्वतःचा माणूस ईडी चालवायला ठेवला असावा अशी शक्यता नाकारता येणार नाही, असे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या. ट्विटरचा खूप चांगला वापर हा धमक्यांसाठी भाजपा पक्ष करतो, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
नवाब मलिक अनेक भाजपाच्या नेत्यांचे सत्य जनतेपुढे मांडत आले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न होत असल्याची शक्यता आहे. नवाब मलिक या चौकशीला संपूर्ण सहकार्य करतील असा विश्वास खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.