प्रतिनिधी (रमेश खेमनर) : श्रीरामपूर ( जि.अहमदनगर) – कुख्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल करून घेण्यास उशीर केल्याचा ठपका ठेवत श्रीरामपूर येथील शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांना निलंबित करण्यात आले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सदर निलंबनाची कारवाई केली.
शहरातील कुख्यात आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर (वय 35) याने 16 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला तीन वर्षांपूर्वी शाळेतून पळून नेले होते. तिचे जबरदस्तीने धर्मांतर करून तिच्यासोबत निकाह केला. तसेच तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले होते. त्यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती झाली होती. तसेच कोणाला सांगितलं तर काटा काढण्यात धमकी त्यांनी दिली होती. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार केल्या होत्या. मात्र, याप्रकरणी फिर्याद दाखल करून घेण्यास विलंब केला. यासंदर्भात पीडित मुलीच्या पालकांनी उपधीक्षक संदीप मिटके यांच्याशी संपर्क साधल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या मुलीच्या पालकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील व महानिरीक्षक शेखर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पाटील यांनी उपधीक्षक मिटके यांना चौकशीचे आदेश दिले होते. मिटके यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत सानप हे दोषी आढळले होते. हा अहवाल मिटके यांनी पाटील यांच्याकडे व त्यानंतर तो विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. याप्रकरणी शेखर यांनी सानप यांच्यावर फिर्याद घेण्यास विलंब केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांना दिले होते. त्यानुसार पाटील यांनी सानप यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
या कालावधीत सानप यांची विभागीय स्तरावर चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वीच याच प्रकरणात फिर्यादी पक्षावर फिर्याद मागे घेण्याबाबत नेहमीच दबाव आणल्याप्रकरणी गुन्हे शाखेतील कर्मचारी पंकज गोसावी याला निलंबित केले होते. त्यानंतर सानप यांच्यावर झालेल्या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
सानप यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यासंदर्भात जिल्हा अधीक्षक मनोज पाटील यांनी दुजोरा दिला आहे. उपधीक्षक मिटके यांनीही या संदर्भातील आपल्याला आदेश प्राप्त झाले आहेत. मात्र, आपण रजेवर असल्याचे सांगत याविषयी फारसे बोलणे टाळले. दरम्यान, तालुका पोलीस ठाण्यातील निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्याकडे शहर ठाण्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला असून त्यांनी तो स्वीकारला आहे.