नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत युती केली त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणीही गुरुवारी होणार आहे.
शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर गेल्या महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पुढे ढकलली गेली होती. पण, आज शिवसेनेनं याबद्दल सरन्यायाधीशांकडे विनंती केली. त्यामुळे अखेरीस सुनावणी घेण्यात आली. सरन्यायाधीश एनव्ही रमन्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायाधीशांनी शिवसेनेची बाजू ऐकूण घेतली आहे. हे प्रकरण आता 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणीही गुरुवारी म्हणजे 2 दिवसांनी होणार आहे.