प्रतिनिधी (गंगासागर पोकळे ) मुंबई – अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणली होती. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी गुवाहाटीवरून केलेले विधान मागे घेत असल्याचं सांगत माझ्याकडून हा विषय संपला असल्याचं जाहीर केले. मात्र त्यानंतर बच्चू कडू यांनी मेळावा घेत अप्रत्यक्षपणे रवी राणा यांना माफ करत इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा कडू यांच्या विधानावरून रवी राणा यांनी तोंडसुख घेत त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली. त्याला बच्चू कडू यांनीही आम्ही तयार आहोत असं प्रत्युत्तर दिले आहे.बच्चू कडू म्हणाले की, मी भाषणात कोथळा काढू म्हटलं, त्यात रवी राणाचं उल्लेख केला नव्हता. कुणी आमच्यावर विनाकारण आरोप करत असेल तर त्याचा कोथळा बाहेर काढू असं बोललो होतो. आता रवी राणांनी ते स्वत:वर ओढावून घेणे हा त्यांचा विषय आहे. राहिला विषय घरी येऊन मारण्याचा तर मी तयार आहे. त्याने घरी यावं अथवा अन्य कुठे बोलवावं मी तिथे येतो असं प्रत्युत्तर त्यांनी दिले.
त्याचसोबत रवी राणाने हा वाद पुन्हा सुरू केला. सवय आहे तो एवढा मोठा नाही. मी आमदार होणार की नाही हे जनता ठरवणार आहे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. परंतु रवी राणाला सांगतो मी ५ तारखेला घरी आहे त्याने मारायला यावं. मी शांतता बाळगणार आहे. त्याला मारायचं असेल तर ५ तारखेला किती वाजता घरी येणार सांगावं, मी तयार आहे, मार खायलाही तयारी आहे असा प्रतिइशारा बच्चू कडू यांनी आमदार रवी राणांना दिला आहे.काय म्हणाले होते रवी राणा?मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीमुळे बच्चू कडू यांच्यासोबतचा वाद मिटला आहे. पण लक्षात घ्या, कुणी मला दम देत असेल तर रवी राणाने उद्धव ठाकरेंचाही दम खाल्ला नाही. बच्चू कडू काहीच नाही.
जर कडू दम देत बोलत असेल तर कुठल्याही स्तरावर मी उत्तर देईन. तो ज्या स्तरावर बोलेल त्यावर उत्तर देईन. प्रेमाच्या भाषेपुढे रवी राणा एकदा नाही तर दहावेळा झुकेल. पण कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारायचीही हिंमत आहे असा इशारा आमदार रवी राणांनी दिला.