अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण :- पारनेर तालुक्यामध्ये आमदार निलेश लंके यांचा प्रभाव आणि राजकीय वर्चस्व कायम असल्याचे मंगळवारी लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. एकूण 16 पैकी 12 ग्रामपंचायत आ.लंके यांचाच डंका वाजला. विरोधकांना धोबीपछाड करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
पारनेर तालुक्यात एकूण 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये प्रामुख्याने भाळवणी, वनकुटे, कोहकडी, गोरेगाव, म्हस्केवाडी, चोंभुत, ढवळपुरी आणि इतर ग्रामपंचायतीचा समावेश होता. आमदार निलेश लंके यांची तालुक्याच्या राजकारणावर मजबूत पकड आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला अनन्य साधारण असे महत्त्व प्राप्त झाले होते. मोठ्या गावामध्ये निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने सुद्धा जोर लावला होता. विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पर्यायाने आमदार निलेश लंके यांना आव्हान दिले होते. यामध्ये 12 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंडा फडकवण्यात आ. लंके आणि त्यांच्या समर्थकांना यश आले. दोन ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाने विजय मिळवला. तर एक ग्रामपंचायत शिंदे गटाकडे आणि एका ठिकाणी संमिश्र निकाल लागल्याचे समजते. या विजयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत एक प्रकारे आनंदोत्सव साजरा केला.
नगर तालुक्यातील नऊ पैकी सहा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी!
मतदारसंघातील नगर तालुक्यातील सामाविष्ट चाळीस गावांपैकी नऊ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यापैकी सहा ठिकाणी आमदार निलेश लंके यांच्या विचारांचे सरपंच निवडून आले. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा विजय झाला.
सुजाण नागरिकांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात जास्त राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांना विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार व्यक्त करतो. विजय संपादित केलेल्या सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
निलेश लंके आमदार पारनेर नगर