Disha Shakti

Uncategorized

महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही व विधिमंडळात ठराव मांडणार – मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Spread the love

विशेष प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : कर्नाटक सीमावादात एक महत्त्वाची बातमी. महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, या भूमिकेचा कर्नाटक विधिमंडळाने काल पुनरुच्चार केला. याबाबत विधिमंडळात ठराव मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. कर्नाटकचंही हिवाळी अधिवेशन सुरु आहे. काल कर्नाटक विधानसभेत सीमाप्रश्नावर चर्चा झाली. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाप्रश्नाबाबत दोन्ही सभागृहांत ठराव मंजूर करुन घेण्यात येणार असल्याचं म्हटले आहे.सीमाप्रश्न संपलेला आहे. महाराष्ट्राला एक इंचभरही जमीन देणार नाही, अशा आशयाचे ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत याआधीही मंजूर करण्यात आले आहेत. याच भूमिकेचा पुनरुच्चार करणारा ठराव पुन्हा मांडण्यात येईल, असं बोम्मई म्हणाले. त्यांच्या या भूमिकेला विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते सिध्दरामय्या यांनीही पाठिंबा दिला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला इशारा दिला आहे. सीमाप्रश्नाचावापर राजकीय कारणासाठी करु नये, असे आवाहन त्यांनी केले होते. त्याचवेळी ते याआधी म्हणाले होते, कर्नाटक राज्य आपली एक इंचही जमीन शेजारच्या राज्याला देणार नाही.दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत अलिकडेच बैठक झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे या बैठकीला हजर होते. 20 ते 25 मिनिटात ही बैठक संपली. गेल्या काही दिवसात महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न चिघळला होता. महाराष्ट्रातून जाणाऱ्या काही गाड्यांवर कर्नाटक सीमाभागात कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांना यात हस्तक्षेप करावा लागला. हा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा वादग्रस्त विधान करत असल्याने हा वाद सुटण्याऐवजी चिघळण्याची शक्यता अधिक आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!