प्रमोद डफळ (प्रतिनिधी) : जमीन खरेदी विक्री क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होत असून यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे एजंट लोक यांच्याकडे या व्यवसायाचे कुठलेही लायसन्स आणि प्रशिक्षण नसते त्यामुळे चुकीच्या व्यक्तीकडून चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून रियल इस्टेट एजंट लोकांना देखील आता महारेराचे व्यावसायिक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी परीक्षा द्यावी लागणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा निर्णय असून यामुळे रिअल स्टेट क्षेत्रात होणाऱ्या फसवणुकीला आळा बसेल अशी आशा आहे.
1 सप्टेंबर नंतर या प्रमाणपत्रा शिवाय कुणालाही अशा स्वरूपाचा व्यवसाय करता येणार नाही. असे आदेश महारेराने काढलेले असून रियल इस्टेट क्षेत्रात व्यावसायिकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणताही प्लॉट अपार्टमेंट युनिट किंवा इमारतीची विक्री करण्यापूर्वी एजंट म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीने स्वतःची नोंदणी महारेराकडे करावी असे आदेश करण्यात आलेले असून अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय यापूर्वीच घेणे अपेक्षित होते.
प्रगत देशात याआधीच अशा स्वरूपाचे निर्णय घेण्यात आलेले असून त्यामध्ये रियल इस्टेट क्षेत्रात एजंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना सरकारकडून प्रशिक्षण देखील दिले जाते त्यामुळे नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात टाळली जाते आणि वाद निर्माण होत नाही. भारतात देखील अशाच पद्धतीने रिअल इस्टेट क्षेत्रात एजंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षणाची गरज आहे .