Disha Shakti

इतर

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२३ पदवीधर निवडणुकीत त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी- विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Spread the love

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

प्रतिनिधी:प्रमोद डफळ / अहमदनगर दि. २३ जानेवारी :- वेगवेगळ्या निवडणुकीत यापूर्वी आपण काम केले असले तरी प्रत्येक निवडणूक नवीन असते. त्यामुळे निवडणूकीच्या प्रक्रियेत त्रुटी राहणार नाहीत. याची निवडणूक कामकाजा साठी नियुक्त अधिकारी – कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. अशा सूचना नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज येथे दिल्यात.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२३ साठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुसरे निवडणूक प्रशिक्षण सत्र सहकार भवन सभागृहात आज पार पडले. त्यावेळी विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष येरेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने मतदार प्रक्रियेविषयी दिलेल्या सूचना व नियमांचे प्रत्येक केंद्राध्यक्षांनी काळजीपूर्वक पालन करावे. ईव्हीएम व बॅलेट पेपरद्वारे पार पडणारे मतदान यामधील फरक समजून घ्यावा. फॉर्म १६ हा या निवडणूकीत अत्यंत महत्त्वाचा असतो. फॉर्म १६ चे काटेकोरपणे अवलोकन करावे‌. मतदान केंद्रावरील सूक्ष्म हालाचालींची वेब कॅमेराद्वारे निवडणूक आयोग प्रत्येक क्षणाला पडताळणी करत असते. त्यामुळे केंद्राध्यक्षांनी मतदान केंद्रावरील सर्व सूक्ष्म घटनेच्या वेळोवेळी नोंदी ठेवाव्यात.

संपूर्ण निवडणूकीत कोणत्याही प्रकाराच्या त्रुटी राहू नये. गोंधळ निर्माण होऊ नये‌. यासाठी काळजी घ्यावी. अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री.भोसले म्हणाले, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वयंप्रेरणा ठेवून निवडणूक कामकाज काटेकोरपणे समजून घ्यावे. निवडणूकीत झालेल्या चुकांना क्षमा नसते. त्यामुळे काळजीपूर्वक काम करावे. जिल्ह्यात १४७ मतदान केंद्राच्या माध्यमातून मतदान पार पडणार आहे. सकाळी ८ वाजता मतदान सुरू होईल. याची दक्षता घेण्यात घ्यावी. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तत्पूर्वी, विभागीय आयुक्तांनी सभागृहाबाहेर असलेल्या निवडणूक मतपेट्यांची पाहणी केली व उपस्थित अधिकाऱ्यांना-कर्मचारी यांना यासंदर्भात सूचना दिल्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!