वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिला आमरण उपोषणाचा इशारा…
प्रतिनिधी/दत्तु पुरी – राहुरी तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, ता उपाध्यक्ष गणेश पवार , शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे यांनी जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे .दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सन 2022 मध्ये जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन बाजरी,मका,कापूस, कांदा, भाजीपाला, फळपिके,व इतर पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हाता -तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग हा आर्थिक संकटात सापडला आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये अक्षरक्षा पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेत शिवारातील उभे पिके वाहून गेली तसेच शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे काढणीस आलेली पिके शेतातच सडून शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्यात आलेले आहेत.पीक नुकसानीचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे देखील पाठवले आहे.
शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून तीन ते चार महिने झालेले आहेत तसेच नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन निर्णय देखील येऊन देखील अद्यापही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही .अतिवृष्टी, पुर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एक हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत दिली जाते परंतु रब्बी हंगाम सुरू होऊन देखील एक महिना होऊन गेला आहे तरी अद्यापही शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाई ची वाट बघावी लागत आहे.ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.व यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीअन्यथा 20 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला .