पारनेर प्रतिनिधी / शेख युनुस : अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या समाजाभिमुख उपक्रमामुळे संस्था सभासदारांच्या गळ्यातील ताईत झाली असून सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली आहे, असे प्रतिपादन पारनेरचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी पारनेर शाखेच्या सेवानिवृत्त सभासद कृतज्ञता सोहळा व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ प्रसंगी केले. यावेळी पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, ज्येष्ठ पत्रकार मार्तंडराव बुचुडे, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे, सोसायटीचे चेअरमन अशोकराव ठुबे, व्हाईस चेअरमन धोंडीभाऊ राक्षे, संचालक दिलीप काटे, ज्ञानेश्वर काळे, आप्पासाहेब शिंदे, सत्यवान थोरे, बाबासाहेब बोडखे, उपप्राचार्य दिलीपराव ठुबे, माजी संचालक कल्याण ठोंबरे, शिक्षक नेते सुदाम दळवी, शेखर उंडे, रामदास झेंडे, सरपंच भाऊसाहेब भोगाडे, शाखा व्यवस्थापक संदीप दाते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सभासदांसाठी काम करत आहे. त्यामुळे अतिशय कमी ७ टक्के व्याजदराने कर्ज वाटप करून सभासदांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. सोसायटीचे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांच्या मार्गदर्शनात संस्था चांगली कार्य करीत आहे. आजच्या कार्यक्रमातून सेवानिवृत्तांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान हा त्यांना प्रेरणा देणारा आहे. ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे म्हणाले की, सोसायटीच्या माध्यमातून सभासद हितासाठीच प्रयत्न केले जात आहे. सभासदांना गरज लागल्यास कोणासमोर हात न पसरवता दोन मिनिटात कर्ज मिळावे यासाठी व सभासदांची पत निर्माण करण्यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशील आहे. संस्थेमार्फत कन्यादान योजना, शहीद जवान मदत निधी, गुणवंत पाल्य गौरव, सेवानिवृत्त सभासद कृतज्ञता, मयत सभासद कर्ज निवारण आदीतून सोसायटी सभासदांसाठीच कार्य करीत आहे.जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वारसांना सोसायटीकडून पन्नास हजार रुपये मदत दिली जात होती इथून पुढे ती एक लाख रुपये दिली जाईल, असेही कचरे यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार मार्तंडराव बुचुडे म्हणाले की, जिल्ह्यात व राज्यात अनेक पगारदार संस्था आहेत मात्र अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे कार्य अतिशय पारदर्शक व सभासद हिताचे आहे. यातून सभासदांमध्ये आपल्या संस्थेबद्दल आत्मीयता दिसून येते. त्याचप्रमाणे सभासदांसाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमामुळे संस्था ही सभासदांसाठी कामधेनू ठरली आहे. याप्रसंगी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. चेअरमन अशोकराव ठुबे यांनी प्रास्ताविक तर शिक्षक लतीफ राजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
समाजाभिमुख उपक्रमांमुळे सोसायटी सभासदांच्या विश्वासास पात्र – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे.
Leave a reply