Disha Shakti

इतर

मराठी भाषेचा अधिक प्रचार, प्रसार करा- अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी

Spread the love

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी / प्रमोद डफळ : अहमदनगर दि.२७ फेब्रुवारी – आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपली भाषा याचा गौरव करणे आणि त्याची अस्मिता आणि अभिमान बाळगणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याबरोबरच तीचा अधिकाधिक उपयोग व वापर होऊन मराठी भाषेचा अधिक प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी श्री मापारी बोलत होते.
व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य डॉ. संजय कळमकर, किशोर मरकड, प्रा. शशिकांत शिंदे, ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाचे अधीक्षक संतोष यादव, राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर थोपटे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी म्हणाले की, भाषा हे जरी ज्ञान मिळविण्याचे माध्यम असले तरी त्या पुढेही जाऊन आपल्या भाषेचा विकास आणि संवर्धन करणे ही आपलीच जबाबदारी आहे. मराठी भाषा अधिक सोईस्कर असुन ती प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे. मराठी भाषेचा अधिक प्रमाणात प्रचार, प्रसार होण्याच्यादृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करत आजच्या तरुण पिढीचा समाजमाध्यमांकडे अधिक ओढा दिसतो. त्यामुळे वाचनाची सवय लोप पावत चालली असुन तरुणांनी वाचनाची सवच अंगिकारण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. संजय कळमकर म्हणाले, सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेणारी नदीसारखी अशी आपली मराठी भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज असुन तरुण पिढीने मराठी भाषेला आपलसं करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर म्हणाले की, जिल्ह्यातील वाचकांच्या वाचनाची भूक भागविण्याचे काम जिल्हा ग्रंथालय कार्यालयमार्फत करण्यात येत आहे. कार्यालयात 26 हजार पेक्षाही अधिक पुस्तकांचा साठा उपलब्ध असुन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी पुस्तके या ग्रंथालयामध्ये असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे अधीक्षक संतोष यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शशिकांत शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ. अमोल बागुल यांनी केले तर आभार किशोर मरकड यांनी मानले.
कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणाने व राज्यगीताने करण्यात आली तर कार्यक्रमाचे शेवट पसायदानाने करण्यात आला.

 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी उत्साहात
मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथदिंडीचे पुजन करण्यात आले. राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनीं पारंपारिक वेषभुषेमध्ये या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या. लेझीम, ढोल वादनाने तसेच मराठी भाषा, ग्रंथ यांची महती सांगणारे घोषवाक्याने संपुर्ण परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. विद्यार्थीनींनी लेझिमच्या तालावर विविध कलाकृती सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली.

त्याचबरोबर विविध पुस्तकांचा समावेश असलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनही या ठिकाणी उभारण्यात आले होते. हे प्रदर्शन या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधुन घेत होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!