नांदेड प्रतिनिधी / मिलींद बच्छाव : ज्याप्रमाणे फळे,फुले मिळावीत म्हणून आपण त्यांचे रोप लावतो, त्याची निगा करतो, तेव्हा त्या झाडाला हवी तशी फुले, फळे येतात. तसेच यशाचे असते. कोणत्याही क्षेत्रात आपणाला यश हवे असेल तर त्यासाठी जिद्दीने अभ्यास करणे आवश्यक असते.तरच आपणाला जीवनात यश प्राप्त होते. अभ्यास हे भावी आयुष्यातील यशाचे बीजारोपण असते, असे प्रतिपादन अर्धापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले.
काल शनिवार दि.१८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी सुरू केलेल्या रात्रीच्या वर्गास भेट दिल्यानंतर मुलांशी संवाद साधताना ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की मालेगाव (ता. अर्धापूर) येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये गेली चार वर्ष सातत्याने शिवा कांबळे हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी परीक्षा पूर्वतयारी म्हणून विशेष रात्रीचा वासंतिक वर्ग आयोजित करून विद्यार्थ्यांना ते सतत प्रेरणा देत आहेत.
महाशिवरात्रीच्या सुटीच्या दिवशी सुद्धा हा वर्ग चालू असल्याचे पाहून गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी शिवा कांबळे यांचे मनापासून कौतुक केले. शिवा कांबळे यांचे हे कार्य शिक्षण विभागासाठी अत्यंत अभिमानास्पद असून इतर शाळांनीही यापासून प्रेरणा घेतली पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अशा उपक्रमशील शिक्षकांच्या धडपडीला शाळेने आणि गावाने समर्पित भावनेने सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे असेही ते म्हणाले. या रात्रीच्या अभ्यास वर्गासाठी शिवा कांबळे यांच्या भोजनाची व्यवस्था करणारे मालेगाव नगरीतील वृक्षमित्र फाउंडेशनचे ईश्वर पाटील यांच्या कार्याचा ही गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी रात्रीच्या अभ्यास वर्गाच्या वतीने संयोजक तथा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी रात्र शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a reply