अ.नगर प्रतिनिधी /वसंत रांधवण : जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या बांधण्यासाठी तालुक्यातील विविध शाळांना ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी दिली. तालुक्याच्या विविध भागांतील जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांची दुरावस्था झाल्याने नव्याने शाळा खोल्या बांधणे क्रमप्राप्त आहे. जिल्हा परिषदेमार्फत त्यासाठी सुजित झावरे यांनी निधी उपलब्ध केला परंतु शाळा खोल्यांची संख्या अधिक असल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच खासदार डॉ सुजय विखे यांच्याकडे झावरे यांनी शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. झावरे यांच्या मागणीची दखल घेत मंत्री राधाकृष्ण विखे तसेच खासदार सुजय विखे यांनी शिर्डी संस्थांमार्फत शाळा खोल्यांसाठी निधी देण्याचे मान्य केले होते. पहिल्या टप्प्यातील १० कोटींच्या निधीमधून पारनेर तालुक्यातील तास वनकुटे, ठाकरवाडी, सुतारवाडी, ढवळपुरी,शिरापूर, कान्हूरपठार, पुजारी मळा, रायतळे, पवारवाडी सुपे येथील शाळा खोल्यांसाठी प्रत्येकी १२ लाख असा ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे झावरे यांनी सांगितले.
झावरे म्हणाले की,आपणाकडे सध्या कोणतेही पद नसतानाही तरीही आपण जिल्हा परिषद, राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजनांसाठी, विकास कामांसाठी निधी उपलब्ध करीत आहेत. सत्ता, पदापेक्षा जनतेची कामे मार्गी लावणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. सत्ता येते आणि जाते. सामान्य जनतेशी जोडलेली नाळ मात्र कायम टिकून राहते. त्यासाठी सर्वसामान्यांचे आश्रु पुसण्यासाठी, त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असतो असे नमूद केले.
Leave a reply