विशेष प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला हाेता. त्यानुसार राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. पुढील तीन दिवस राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, जळगाव, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाच ते आठ मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. सात मार्चला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.राज्याने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात उन्हाचा चटका अनुभवला. ताेच आता अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा जाेर राहणार आहे.
यानुसार नाशिक जिल्ह्यातील मनमाड परिसराताल पावसाने झाेडपून काढले. विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने मनमाडला हजेरी लावली. हा पाऊस रात्रभर सुरू हाेता. पावसामुळे शेतांसह रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले हाेते. गहू, कांदा, हरभरा या पिकांचे माेठे नुकसान झाले. धुळे जिल्ह्यातही गारपीट झाली. वीज पडल्याने तीन बैलांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि शिंदखेडा या भागात वादळी वाऱ्यासह गहू, हरभरा, मका पिकांचे नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला आहे. हवामानाची ही परिस्थिती पुढील तीन दिवस अशीच राहिल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
Leave a reply