अ.नगर प्रतिनिधी /शेख युनुस : होळी हा भारतीयांचा खूप मोठा व पारंपारिक सण असून या सणाला सध्या वेगळेच रूप आलेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक रंगांचा वापर केला जातो. मात्र यामुळे आपल्या शरीराला अपाय होऊ शकतो. तेव्हा आपण नैसर्गिक रंगांनी होळी साजरी केली पाहिजे असे प्रतिपादन सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पारनेरच्या वैशाली भलावी यांनी प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी या ठिकाणी “खेलो होली – इको फ्रेंडली” अंतर्गत नैसर्गिक रंगांची निर्मिती या कार्यशाळेत केले.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदीप महांडुळे, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख शिक्षक लतिफ राजे, शिक्षक संतोष पट्टेकर, सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक प्रशांत फुलारे लखन शिंदे, श्रीमती इरोळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास भालेराव, शिक्षक समाधान भुसारे, सोनाली नारायणे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बीट, पळसाचे फुल, हळद इत्यादींपासून नैसर्गिक रंग कशाप्रकारे तयार केले जाऊ शकतात याची आयोजित कार्यशाळेत माहिती देण्यात आली.
याप्रसंगी शिक्षक लतिफ राजे यांनी विद्यार्थ्यांना विविध नैसर्गिक रंग बनवून दाखविले तसेच रासायनिक रंगांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम याची माहिती दिली.याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक संदीप महांडुळे म्हणाले की, होळी सण साजरा करताना तो पर्यावरण पूरक व साजरा केला पाहिजे. पुर्वी आपले सर्व सण हे पर्यावरण पुरक साजरे केले जात होते. मात्र आज त्यात आधुनिकता आल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यावरण हाणी व प्रदुषणाचे प्रमाण वाढले आहेत. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांनी होळी साजरी करण्याचा संकल्प केला.
Leave a reply