राहुरी प्रतिनिधी / सचिन दिवे : देवळाली प्रवरा – (दि. १५ मार्च २३ ) : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा हद्दीत असलेल्या डॉ. बा. बा. तनपुरे सह. साखर कारखान्याचे चेअमन, व्हा. चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळाला कारखान्याची संलग्न संस्था असलेल्या श्री लक्ष्मी नारायण प्रतिष्ठान ट्रस्ट मालकीच्या कोट्यावधी रुपये किमतीची ५६ गुंठे जमीन परस्पर विक्री झाल्यामुळे अहमदनगरच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाने संचालक मंडळाला चौकशी कामी गुरुवार दि. १६ मार्च रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली असून कोट्यावधी रुपये किमतीची जमीन परस्पर विकणाऱ्या शेजाऱ्याला पाठबळ कोणाचे? असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी विचारला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांच्या तक्रारीवरून संबंधित कागदपत्र सादर करण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाला अहमदनगरच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून वेळोवेळी नोटीस बजावून म्हणणे मांडण्याची संधी देन्यात आली. तथापि संचालक मंडळाने धर्मदाय आयुक्त कार्यालयाला म्हणणे मांडण्यासाठी वारंवार मुदतवाढ मागितली. त्यामुळे धर्मदाय आयुक्त कार्यालयाने स्वतःच थेट लक्ष्मीनारायण प्रतिष्ठान ट्रस्ट च्या कार्यालयात भेट देऊन कागदपत्र तपासण्याचा निर्णय घेतला असून सर्व संचालक मंडळाला दि.१६ मार्च रोजी कारखाना कार्यस्थळावर ट्रस्टच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस दिली आहे.
नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रहारच्या आप्पासाहेब ढूस यांनी कारखान्याचे कामगार व सभासद तसेच जिल्हा बँकेचे देणे देण्यासाठी मे. न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची मालमत्ता लिलाव करून विक्री करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर बोलताना नगर मनमाड महामार्ग लगत देवळाली प्रवरा हद्दीमध्ये गुहा शिवेजवळ कोट्यावधी रुपये बाजार मूल्य असलेल्या कारखाना संलग्न संस्था असलेल्या श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट मालकीची शेजाऱ्याने परस्पर विक्री केलेल्या ५६ गुंठे जमिनीच्या बाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर कोणताही निर्णय झाला नाही म्हणून ढूस यांनी अहमदनगरच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल केली.धर्मदाय आयुक्त कार्यालयाने कारखान्याच्या संचालक मंडळाला याबद्दल कागदपत्र सादर करण्याच्या वारंवार नोटीसा देऊनही कारखाना संचालक मंडळ कागदपत्र देऊ शकले नसल्याने धर्मदाय आयुक्त कार्यालयाने कारखाना कार्यस्थळावर असलेल्या ट्रस्टच्या कार्यालयात येऊन कागदपत्र तपासण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री लक्ष्मीनारायण प्रतिष्ठान ट्रस्ट ही डॉ. तनपुरे सह. साखर कारखान्याची संलग्न संस्था असून कारखान्याचे संचालक मंडळ हेच या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून काम पाहण्याची या ट्रस्टच्या घटनेत तरतूद आहे. तसेच श्री लक्ष्मीनारायण प्रतिष्ठान ट्रस्ट हे अहमदनगर येथील धर्मदाय कार्यालय मार्फत नोंदणी झालेले नोंदणीकृत ट्रस्ट असल्याने धर्मदाय आयुक्त कार्यालयाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय या ट्रस्टच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल अथवा विक्री करण्याचा अधिकार संचालक मंडळाला नाही. असे असताना सन २००६ मध्ये या कोट्यावधी रुपये किमतीच्या जमिनीची शेजाऱ्याने परस्पर विक्री केली आहे. तथापि कारखाना प्रशासनाने अद्याप पावेतो यावर कोणत्याही प्रकारची हरकत अथवा विरोध नोंदविला नसल्याचे समजते.
प्रहारचे आप्पासाहेब ढूस यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये ढूस यांनी म्हटले आहे की, कारखाना अत्यंत आर्थिक अडचणींचा सामना करीत असून कामगारांचे आणि सभासदांची देणी थकली आहे. त्यासाठी कारखान्याने काही मालमत्ताही विकल्या आहेत. व बँकांची देणी थकल्याने काही मालमत्तांचा नुकताच लिलाव निघाला होता. असे असताना कारखान्याच्या कोट्यावधी रुपये किमतीची मालमत्ता परस्पर विक्री होत आहेत. त्यामध्ये देवळाली प्रवरा हद्दीत गुहा शिवेजवळ व नगर मनमाड महामार्गलगत असलेल्या गट नंबर ८७७ मधील ५६ गुंठे खराबा क्षेत्र हे १९८५ साली कारखान्याचे तत्कालीन चेअरमन प्रसादराव तनपुरे यांनी खरेदी खतांद्वारे खरेदी केलेली आहे. त्याचे खरेदी खत, सर्व फेरफार व उतारे आजही उपलब्ध आहेत. परंतु त्याच गटामध्ये केवळ ५० गुंठे मालकी हक्क असलेल्या व्यक्तीने हे खराबा क्षेत्र स्व-मालकीचे असल्याचे दाखवून व तत्कालीन महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून कागदपत्रांमध्ये फेरफार केली व स्वतःची ५० गुंठे व श्री लक्ष्मीनारायण प्रतिष्ठान मालकीची ५६ गुंठे अशी एकूण १०६ गुंठे जमीन विक्री करून परस्पर विल्हेवाट लावली आहे. संबंधितांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाची जमीन विक्रीसाठी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच या जमिनीची फाळणी बारा करण्यासाठी सुद्धा धर्मदाय आयुक्त कार्यालयाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही.
फळणी बारा करताना संबंधित व्यक्तीने कारखाना व त्याच गटातील अन्य मालकांच्या खोट्या सह्या करून व मोजणी विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून फाळणी बारा केल्याचे दाखवून चतुःसीमा निश्चित केली. ही बाब ढूस यांनी लेखी पत्राद्वारे एक वर्ष अगोदर कारखाना प्रशासनाला कळविली होती. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेतही हा विषय चर्चेला घेतला होता. तथापि या विषयावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने ढूस यांनी अहमदनगरच्या मे. धर्मादाय कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने अहमदनगरच्या धर्मदाय कार्यालयाने कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाला चौकशी कामी कागदपत्र सादर करण्याची वेळोवेळी तारीख देऊन संधी दिली. परंतु कारखाना प्रशासनाने म्हणणे देण्यासाठी वारंवार वेळ वाढवून मागितल्याने शेवटी मे. धर्मदाय आयुक्त कार्यालयाने स्वतःच कारखाना कार्यस्थळावरील श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट कार्यालयात येऊन कागदपत्र तपासण्याचा निर्णय घेतल्याने कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाला चौकशीकामी हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे कारखाना प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून चौकशीकामी हजर राहून संचालक मंडळ कारखान्याची जमीन वाचवते की परस्पर विक्री करणाऱ्या शेजाऱ्याला पाठीशी घालते याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.
कारखान्यावर आर्थिक आरिष्ठ कोसळली आहे, कामगार आणि सभासद देशोधडीला लागला आहे. तरीही श्री लक्ष्मीनारायण प्रतिष्ठान ट्रस्ट मालकीची कोट्यावधी रुपये किमतीची जमीन शेजाऱ्यांनी परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली याचे कुणालाही सोयर सूतक असल्याचे जाणवत नाही. जमीन विक्रीची घटना २००६ साली घडली आहे. त्यावेळी हे संचालक मंडळ अस्तित्वात नव्हते. तरीही या गंभीर घटनेबद्दल धर्मदाय आयुक्त कार्यालयाला माहिती देण्यासाठी ते उदासीन असल्याचे जाणवते. त्यामुळे या संचालक मंडळाबाबत सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून ते दूर करण्यासाठी कारखाना प्रशासनाने या विषयावर आपली भूमिका लवकर स्पष्ट करणे गरजेचे आहे असे आप्पासाहेब ढूस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले
Leave a reply