सावळीविहिर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन
प्रतिनिधी / प्रमोद डफळ : शिर्डी – सावळविहिर व परिसरातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न एका महिन्याच्या आत सोडविणार असून कोणतीही रेडी रेकनर आकारणी न करता वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात येतील. अशी ग्वाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिली.
राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथील ७ कोटी ७८ लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनी विखे-पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, राहता पंचायत समितीचे उप अभियंता देविदास धापटकर, सावळीविहिरचे सरपंच ओमेश साहेबराव जपे, बाळासाहेब जपे आदी यावेळी उपस्थित होते.
महसूलमंत्री श्री.विखे-पाटील, महापुरुषांच्या जयंती साजरी करतांना त्यांच्या आचार-विचारांवर कार्यकर्त्यांनी काम करावे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज आपला देश जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता ठेवतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे भव्य स्मारक उभे राहत आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. बेरोजगारी कमी होत आहे. कोवीड काळात सतत दोन वर्ष देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य वाटप करण्यात आले. मोफत लसीकरण करण्यात आले.
परिसरातील तरूणांना रोजगाराच्या संधी –
नवीन होणारा ग्रीन फिल्ड कॅरिडार, मुंबई -नागपूर समृध्दी महामार्ग पहिला टप्पा सुरू झाला आहे. मुंबई ते शिर्डी दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लॅडिंग सुरू झाले आहे. शिर्डी विमानतळाचा विस्तार करत नवीन टर्मिनल इमारत होणार आहे. साविळीविहिर मध्ये नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. सावळीविहिरमधील सोनवाडी येथे पाचशे एकर जागेत लॉजिस्टिक्स पॉर्क, आयटी पार्क होणार आहे. यामुळे या परिसरातून देशभरात मालाची ने-आण करणे शक्य होणार आहे. यातून येत्याकाळात येथील परिसरातील तरूणांना रोजगारांच्या अनेक संध्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे येथील तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता एकत्र येत स्वत:चा व्यवसाय सुरू करावेत. असे आवाहन ही महसूलमंत्री श्री. विखे-पाटील यांनी यावेळी केले.