पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : बाजार समितीची निवडणुकीसाठी गुरुवारी माघार घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यामध्ये आघाडी झाली असून भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाविकास आघाडीची वज्रमुठ उभी केली आहे. निवडणुकीसाठी एकीकडे तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले असताना दुरंगीचा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. बाजार समिती निवडणुकीत १८ जागांपैकी ५ जागा चर्चेअंती शिवसेना पक्षाला देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी दाखविली. या एकीमुळे नवी राजकीय समीकरणे पारनेर तालुयात पहायला मिळणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात आमदार लंके व माजी आमदार विजयराव औटी यांनी रणशिंग फुंकले आहे. बाजार समितीच्या या १८ जागेसाठी २८ एप्रिलला मतदान होणार असून २९ रोजी मतमोजणी होणार आहे.
पारनेर
![]()
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतून भाजपचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सुनील थोरात, भाजपाचे नेते राहुल शिंदे, माजी उपसभापती विलास झावरे, माजी सभापती गणेश शेळके, बाबासाहेब तांबे, दिलीप दाते, दिनेश बाबर, शिवाजी बेलकर, सुभाष दूधाडे, दादाभाऊ वारे, उपसरपंच प्रदीप गुगळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी माघार घेतली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षांच्या पक्षश्रेष्ठींशी जागा वाटपाबाबत वाटाघाटी चर्चा चालू होत्या. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे ८ जागांसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ जागा देण्याबाबत चर्चेअंती बुधवारी सायंकाळी बैठकीत निर्णय झाला. परंतु गुरुवारी अखेर १८ जागांपैकी १३ जागा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ५ जागा लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समजली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून तुल्यवाळ उमेदवार देण्याबाबत व्यूहरचना आखली जात आहे. माहाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाला संधी देऊ, असे म्हणत आमदार लंके यांनी ठाकरे गटातील तालुक्यातील नेत्यांना आवाहन केले होते.
गत विधानसभा निवडणुकीनंतर तालुयात राजकीय समीकरणे बदलली. आमदार लंके राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचा पराभव झाला. प्रशांत गायकवाड यांच्यावर दोन वेळा अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न झावरे गटाकडून झाला. मात्र त्याला प्रत्युत्तर देण्यात गायकवाड यशस्वी ठरत त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला.या निवडणुकीत मात्र चित्र बदलले असून राष्ट्रवादीकडून आमदार लंकेयांचा शब्द अंतिम आहे. तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, प्रशांत गायकवाड, अशोक सावंत, सुदाम पवार आदी सोबतीला असणार आहेत. भाजपकडून सुजित झावरे पाटील, विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, राहुल शिंदे, सचिन वराळ आदींच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची निवडणूक लढवली जाणार आहे.
ठाकरे गट बाजार समितीत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. माजी आमदार विजय औटी, जि. प. माजी सभापती काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, माजी सभापती गणेश शेळके, तालुकाध्यक्ष श्रीकांत पठारे, डॉ. भास्कर शिरोळे यांच्या जोरावर विजयश्री खेचण्याचा औटींचा प्रयत्न आहे. जिल्हा बँकेचे दिवंगत अध्यक्ष कै. अॅड उदय शेळके यांचे सोसायटी मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व होते. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीला मोठी उणीव भासणार आहे.
पारनेर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत लंके-औटी यांची आघाडी; १८ जागांसाठी ४१ रिंगणात

0Share
Leave a reply