श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे : श्रीरामपूर, शेवगाव तालुक्यात सुरु असल्येल्या अवैध वाळू वाहतूक करणार्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुस्क्या आवळल्या आहेत. या कारवाईत चार ट्रॅक्टर, तीन ट्रॉली, एक ढंपरसह सहा ब्रास वाळू असा 33 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर सात जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अर्शद शेख, (रा. खानापूर, ता. श्रीरामपूर), सुनिल मोरे, सर्फराज अजगरअली सय्यद, बाळासाहेब जाधव, कलिम पठाण सर्व राहणार (भामाठाण) यांच्यावर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून तीन ट्रॅक्टर, तीन ट्रॅली, एक मोबाईल व दोन ब्रास वाळू असा 18 लाख 30 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर दुसरी कारवाई शेवगाव तालुक्यातील करण्यात आली. त्यामध्ये लक्ष्मण श्यामराव शिंदे, तुकाराम मच्छिंद्र विखे, (दोघे रा. सोनविहीर, ता. शेवगांव) यांच्याकडून एक विनानंबरचा ढंपर व चार ब्रास वाळू असा 10 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिरजगाव येथे एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. असा एकूण 33 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर व शेवगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकास दिल्या. पथकातील मनोहर गोसावी, संदीप दरंदले, सचिन आडबल, विशाल गवांदे, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, मयुर गायकवाड, सागर ससाणे, रोहित येमुल, आकाश काळे व संभाजी कोतकर यांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून अवैधरित्या वाळू चोरी करणार्यांना ताब्यात घेवून 33 लाख 70 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.