प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : संगमनेर तालुक्यातील वडदरा (बोटा) येथील उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय ६२) या व्यक्तीवर घरात येऊन बिबट्याने हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. पठार भागात बिबट्याचे मानव वस्तीवर येण्याचे प्रमाण वाढले आहे. बोटा-अकलापूर रोडवरील वडदरा येथे वास्तव्यास असलेले उत्तम कुऱ्हाडे घरात नेहमीप्रमाणे टीव्ही पहात होते.
घराचा दरवाज्या उघडा असल्याने जवळील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने काही कळायच्या आत त्यांच्यावर घरात घुसून हल्ला चढविला. मानेचा घोट घेत त्यांना जागीच ठार केले. नंतर हा बिबट्या त्यांना फरफटत घेऊन जात होता. तेवढ्यात त्यांचा आईने जोरजोरात आरडाओरड केल्याने मृतदेह टाकून बिबट्याने पळ काढला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.
दरम्यान , वनरक्षक डी.बी.कोरडे, एस.पी.सातपुते, वनसेवक बाळासाहेब वैराळ, आनंथा काळे यांनी घटनास्थळी पोहचून त्यांनी या घटनेची माहिती घेतली. याघटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण दिसून येत आहे. वारंवार बिबट्याचे हल्ल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला असुन रात्रीची शेतीची कामे कसे करायचे हा प्रश्न उभा राहिला आहे.
बिबट्याचा वावर पूर्वी होता मात्र आता तो मोठ्या प्रमाणात वाढला असुन बिबट्या माणसांवरही हल्ले करु लागले असल्याने वनविभागाने गावोगावी पिंजरे लावावेत अशी मागणी माजी आदर्श सरपंच विकास शेळके यांनी केली आहे.