Disha Shakti

Uncategorized

महिनाभरापूर्वीच झाला विवाह; ट्रॅक्टर पलटी झाला आणि सगळ संपल

Spread the love

नाशिक प्रतिनिधी / खंडू कोळेकर : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा शेतकर्‍याचा शनिवारी (दि २२) रात्री ९ वाजता ट्रॅक्टर पलटी होऊन जागीच मृत्यू झाला. या युवा शेतकर्‍याचा महिन्यापूर्वी विवाह झाला होता. या अकस्मात मृत्यूने गाव व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा शेतकर्‍याचा ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबून जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामखेडा, ता. देवळा येथे घडली आहे. राकेश दिनेश धोंडगे असे मृत झालेल्या युवा शेतकर्‍याचे नाव असून, महिन्याभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता. या ह्रदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मूळचे निमगोले येथील असलेले धोंडगे कुटुंब पिळकोस शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रात्री ९ वाजता दिनेश धोंडगे यांचा मुलगा राकेश हा घरून ट्रॅक्टरवर शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असताना खामखेडा येथील शेवाळे वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्यात तो दबला गेला. या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन दबलेल्या राकेशला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अवघ्या महिन्याभरापूर्वीच राकेशचा विवाह झाला होता. पण या दुर्दैवी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने संसार उद्ध्वस्त झाला आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस नाईक सागर पाटील, पोलीस शिपाई सुरेश कोरडे आदी करत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!