Disha Shakti

Uncategorized

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील मानद कर्नलपदाने सन्मानित

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना केंद्र सरकारच्या संरक्षण विभागातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने प्रतिष्ठेचे समजले जाणारे मानद कर्नलपद प्रदान करण्यात आले. विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब पवार सभागृहात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात औरंगाबाद विभागाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडीअर उमेशकुमार ओझा यांचे हस्ते कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना बॅटन व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच मा. कुलगुरु यांना कर्नलपदाची विधीवत वस्त्रे परिधान करण्यात आली. या विद्यापीठातील कुलगुरुंना सलग चार वेळा अशा प्रकारची पदवी देऊन गौरविण्यात आले. आजपर्यंत कृषि विद्यापीठाच्या सहकार्याने राष्ट्रीय छात्र सेनेची जिल्हास्तरीय 10 शिबीरे व 1 राष्ट्रीय एकात्मता शिबीर घेण्यात आली आहेत.

याप्रसंगी कर्नल पी.जी. पाटील आपल्या भाषणात म्हणाले की मी माझ्या कॉलेज जीवनात एन.सी.सी.चा विद्यार्थी राहिलेलो असून एन.सी.सी. ने माझ्या जीवनात शिस्त, समता व देशभक्ती हे गुण रुजविले. एन.सी.सी. हे देशातील सर्वात मोठे व उज्वल असे संघटन असून त्यामुळे युवकांमध्ये ऐक्य, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची वृत्ती हे गुण वाढीस लागतात. माझ्या वतीने राष्ट्रीय विकासात योगदान देण्यासाठी विद्यापीठातील सर्व महाविद्यालयातील एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणार असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलतांना दिले. यावेळी ब्रिगेडीअर ओझा यांनी एन.सी.सी. चा आढावा घेवून देशाच्या बळकटीकरणासाठी एन.सी.सी. ने सातत्याने ध्यास घेतला असून एन.सी.सी. ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करत आहे.

याप्रसंगी मुंबई येथील महासंचालनालयाचे उपमहासंचालक (एन.सी.सी.) ब्रिगेडीअर विक्रांत कुलकर्णी, अहमदनगर येथील 17 महाराष्ट्र बटालीयनचे कमांडींग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. सी.एस. पाटील, डॉ. सुनिल मासाळकर, डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डॉ. गोरक्ष ससाणे, नियंत्रक श्री. विजय पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कुलगुरुंच्या कार्याचा आढावा डॉ. दिलीप पवार यांनी करुन दिला. लेफ्ट. सुनिल फुलसावंगे यांनी सूत्रसंचालन केले. मेजर राम चौधरी यांनी आभार मानले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या उत्कृष्ट संचालनाबरोबरच छात्रसेनेच्या हम सब भारतीय है या गीताला उपस्थितांनी दाद दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!