श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात कुर्हाडीने वार करून तिला जीवे ठार मारुन फरार झालेल्या पतीला श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दिलीप गणपत भारस्कर (रा. शनि चौक, वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर. हल्ली मु. शहागड, ता. गोंडी, जि. जालना) येथील पैठण रोडवरील अफसर शेख यांच्या वीटभट्टीवर त्याच्या कटुंबासह काम करत आहे. त्याने दि. 5 मे 2023 रोजी सांयकाळी 5 वाजेच्या दरम्यान त्याची पत्नी ज्योती दिलीप भारस्कर हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत भांडण करून विटभट्टीवर असलेल्या घरातून कुर्हाड घेऊन पत्नी ज्योती हिच्या डोक्यात जोरात वार करून तिला जिवे ठार मारून फरार झाला होता. याप्रकरणी गोंडी पोलीस ठाणे (जि. जालना) येथे दिलीप गणपत भारस्कर याच्याविरुद्ध गुरनं. 196/2023 भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी दिलीप भारस्कर हा सध्या श्रीरामपूर येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी गुप्त बातमीदारामार्फत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली. त्यांनी तत्काळ तपास पथकास बोलावून सदर आरोपीचा शोध घेण्याचे तोंडी आदेश दिले. तपास पथकाने सदर आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी भारस्कर हा शनि चौक, वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर येथे त्याच्या घरासमोर बसलेला दिसला.
तपास पथकाची चाहूल लागताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा पथकाने त्याला जागीच पकडून पोलीस स्टेशन येथे आणले. त्यानंतर गोंडी पोलीस स्टेशन येथे संपर्क करून तेथील पोलीस पथकास श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे बोलावून त्याला पुढील कारवाई करिता त्यांच्या ताब्यात दिले.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या तपास पथकातील पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गौतम लगड, रमिझ अत्तार, गणेश गावडे, मच्छिंद्र कातखडे, संभाजी खरात यांनी ही कारवाई केली.