राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी नगर पाथर्डी या विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती दिलेली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागून ग्रामस्थांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयानेही स्थगिती उठविण्याचे आदेश निर्गमित केले होते. न्यायालयाची सत्यप्रत शासनाचे मुख्य सचिव यांना सादर करण्यात आली होती. त्यांनीही तातडीने कामे हाती घेण्याचे आश्वासन दिलेले होते.
याच कामापैकी दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना स्थगिती देण्यात आलेली होती. ती स्थगिती तातडीने उठवावी, यासाठी संबंधित कार्यालयास पत्र दिले व आंदोलनाचा इशारा दिलेला होता. त्याची थेट दखल घेत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
अधिक माहिती देताना आमदार तनपुरे यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मे 2022 अखेर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून सदरील कामास प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन नंतर तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. यानंतर या कामाच्या निविदाही मागविण्यात आलेल्या होत्या.
परंतु 8 जुलै 2023 रोजी या कामांना शासनाने स्थगिती दिली. नंतर ऑक्टोबर 2022 मध्ये शासनाने सदरच्या कामाची स्थगिती उठवलेली आहे.असे असूनही या कामाच्या निविदा उघडून कार्यक्रम आणि आदेश देण्याबाबत संबंधित विभागाने काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आठ दिवसात या कामाचे कार्यारंभ आदेश द्यावेत. अन्यथा कार्यालयासमोर लाभधारक शेतकऱ्यां समवेत उपोषणाचा इशारा अप्पर आयुक्त जलसंधारण तथा मुख्य अभियंता मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र पुणे यांना दिलेला होता. या इशारा नंतर संबंधित विभागाने निविदा प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला.
यात पोखर्डी तालुका नगर वन जमिनी जवळ 1 कोटी 19 लाख 80 हजार 159 व पोखर्डी गावठाण येथील 1 कोटी 15 लाख 4 हजार 943 रुपये खर्चाच्या दोन्ही बंधाऱ्याच्या कामाची तसेच कापूरवाडी कराळे मळा नंबर एक येथील बंधाऱ्यास 1 कोटी 92 लाख 3 हजार 464 व कापूरवाडी मुंजाबा 75 लाख 27 हजार 193 रुपये खर्चाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या विकास कामाचा मार्ग मोकळा झाला.या बंधार्यामुळे परिसरातील लाभधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत आमदार तनपुरे यांना धन्यवाद देत आभार मानले. तनपुरे यांनीही या संबंधी पाठपुरावा कायम ठेवल्याने बंधारा उभारणीचे स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठीचे अडथळे दूर झाले आहे
Leave a reply