राहुरी प्रतिनिधि / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी शिंगणापूर रस्त्यावर वाढत्या अपघातांमुळे बळींची ची संख्या लक्षात घेता या रस्त्यावर तात्काळ गतीरोधक व माहिती फलक लावण्यासाठी आज माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली उंबरे येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शनिशिंगणापूर- राहुरी रस्त्यावर वाढत्या अपघातात वाढलेल्या बळी मुळे रस्त्यावर दुभाजक पाहिजे तसेच रिफ्लेक्टरची आवश्यकता आहे.राहुरी तालुक्याचे आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रास्ता रोको आंदोलन करून सरकारचे याकडे लक्ष केंद्रीत केले
राहुरी ते शनी शिंगणापूर कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने या रस्त्यावर आजपर्यंत अनेक अपघात होऊन वीस ते पंचवीस नागरिकांचा अपघातात बळी गेला.सध्याचे शासन याबाबत ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्यामुळे ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आपण न्यायालयात जाणार असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
शिर्डीचे साईबाबा व शिंगणापूर येथील शनि महाराज या जागतिक दर्जाच्या दोन देवस्थानाला जोडल्या जाणाऱ्या राहुरी शिंगणापूर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्याच प्रमाणे या रस्त्यावर अनेक छोटी मोठी गावे येत असून शाळा आहेत. परंतु संबंधित ठेकेदाराने कोणत्याही गावच्या व शाळा अशा महत्त्वाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सूचना फलक लावलेली नाहीत. तसेच साईड पट्ट्याचीही कामे अपूर्ण असल्यामुळे रस्त्यावर प्रवेश करताना अनेक अपघात होत आहेत. या रस्त्याचे काम तत्काळ सुरू व्हावे, यासाठी आज सकाळी नऊ वाजता उंबरे बस स्थानका समोर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन झाले. राहुरी पासून ते शिंगणापूर पर्यंत कमीत कमी २० ठिकाणी गतिरोधक बसवणार. तसेच उर्वरित काम एका महिन्यात सुरू करणार असे लेखी आश्वासन संबंधित ठेकेदाराने आंदोलन स्थळी दिल्याने रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, प्रा. दत्तात्रय अडसुरे, कारखान्याची माजी संचालक सुनील अडसुरे, नवनाथ ढोकणे, साहेबराव दुशिंग, माणिकराव तारडे, भारत तारडे, संदीप दुशिंग, सचिन भिंगारदे, बाळासाहेब लटके, ईश्वर कुसमुडे, गोरक्षनाथ दुशिंग, सरपंच सुरेश साबळे, कारभारी ढोकणे, शहाराम आलवणे, लक्ष्मण काळे, दत्तात्रेय ढोकणे, सुरेश ढोकणे, संजय ढोकणे, भाऊराव कवडे, विजय माळवदे, साहेबराव गायकवाड, ऋषिकेश माळवदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.