कालव्यांची पाहणी करून शेतकऱ्यांशी साधला संवाद
प्रतिनिधी / प्रमोद डफळ : दि.२९ मे २०२३ (उमाका वृत्तसेवा) -निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कालव्याची कामे ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र कामामध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी राहाता आणि संगमनेर तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामांची आज पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी, मनोली, घुलेवाडी, कुरण, खांजापूर, निळवंडे, कौठे कमळेश्वर, गोगलगाव, आडगाव, मापारवाडी, लोणी खुर्द, बाभळेश्वर, पिंप्री निर्मळ, वाकडी आदी गावात कालव्यांच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या दौऱ्यात महसूल, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बहतांशी गावात कालव्यांची काम घेतलेल्या ठेकेदारांनी अर्धवट केली आहेत.अनेक ठिकाणी काम अद्यापही सुरू नाहीत. या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने मुदतवाढ घेतली तरीही कामाची परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून आले. यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेवून प्रलंबित काम वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने
निर्णय करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
अनेक ठेकेदारांनी राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून घेतलेली काम पूर्ण करत नसल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी महसूलमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
निळवंडे कालव्यांची काम पूर्ण करण्यासाठी विभागाने नियोजन करावे, कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होणार असल्याने कालव्यांची काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
निमगावजाळी येथील कालव्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात झालेला विलंब आणि दिसून आलेल्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेतली असून, याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.