दिशा शक्ती प्रतिनिधी / रमेश खेमनर : नाशिक: जन्मदात्या आई-वडिलांसमोरच प्रियकराच्या गाडीवर बसून मुलगी आपले न एकता निघून गेल्याने हताश झालेल्या आई-वडिलांनी काही तासातच नाशिक शहरात रेल्वेखाली आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मुलीच्या आई-वडिलांचे प्रेत नातेवाईकांना दिले होते. मात्र संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ज्या मुलासोबत मुलगी निघून गेली त्या मुलाच्या घरासमोरच त्यांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केला. मयत आई-वडिलांच्या नातेवाईकांनी त्यांचे अंत्यसंस्कार विशिष्ट ठिकाणी न केल्याने त्यांच्या विरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२८ मे रोजी पांढुर्ली, तालुका सिन्नर येथून एक १९ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसमोरच प्रियकराच्या मोटरसायकलवर बसून निघून गेली. मुलीचे आई-वडील तिला प्रियकरासोबत जाऊ नको अशी जीवाचा आटापिटा करून विनंती करत होते. मात्र आपल्या मुलीने आपले न ऐकता ती प्रियकरासोबत निघून गेल्यामुळे याचे दुःख अनावर झाल्याने मुलीचे आई-वडील दोघांनीही निवृत्ती किसन खातळे (४९) आणि त्यांची पत्नी मंजुळा निवृत्ती खातळे (४०) यांनी रेल्वे मार्गावरील पोल क्रमांक 180/01 आणि 180/03 यादरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी गोदान एक्सप्रेसखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली होती.
या घटनेनंतर मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा संशयित समाधान झनकर या तरुणासह त्याच्या साथीदारांवर अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आत्महत्या केलेल्या आई-वडिलांची मुलगी ज्या मुलाबरोबर निघून गेली, तो मुलगा देखील त्याच गावातील रहिवासी असल्याने मयताचे नातेवाईकांनी मुलाच्या घरासमोरच व्हरांड्यात मुलीच्या आई वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून जिल्ह्यात या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
संतप्त नातेवाईकांनी मुलीच्या मयत आई-वडिलांचे अंतिम संस्कार विवक्षित विशिष्ट ठिकाणी न केल्याने त्यांच्या विरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात कलम ४४७, २९७, १४३, १४७ भादविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घोटी पोलीस करीत आहेत.
लेक डोळ्यांदेखत पळून गेली, आई वडिलांचं टोकाचं पाऊल; प्रियकराच्या घरासमोरच दोघांवर अंत्यविधी

0Share
Leave a reply