विशेष प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवीनगर
असे करण्याची घोषणा केली. त्यावरुन विविध राजकीय प्रतिक्रीया समोर येत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी एका गोष्टीची आठवण करुन ट्वीटद्वारे इशाराही दिला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी माझ्या मतदारसंघातील MIDC ची अधिसूचना काढण्याची मागणी सरकारकडे केली होती. पण ही तारीख उलटून गेली तरी सरकारने अधिसूचना काढली नाही.
आता राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत (दि.26) वाट पाहू आणि तरीही अधिसूचना काढली नाही तर आधी जाहीर केल्याप्रमाणे माझ्या मतदारसंघातील युवा आणि नागरिकांसह मंत्रालयात उपोषण करुन जनतेची ताकद दाखवून देऊ असा थेट इशाराच आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
हिवाळी अधिवेशनामध्येही आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्याला उद्योगमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिल्याचे मान्य केले होते. त्यानंतरही रोहित पवारांनी पाठपुरावा सुरुच ठेवला. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्वीट करुन सरकारला इशारा दिला होता. सरकारची स्मरणशक्ती वाढावी म्हणून सरकारला च्यवनप्राश देण्याची आणि प्रसंगी माझ्या मतदारसंघातील युवा आणि नागरिकांसाठी उपोषण करण्याचीही माझी तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, त्याच मुद्द्याला धरुन आता रोहित पवारांनी इशारा दिला आहे.