अ.नगर प्रतिनिधी / युनूस शेख : कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याची तक्रार केल्याच्या रागातून दोन युवकांवर तलवारीने वार करण्यात आले त्याच एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ओंकार ऊर्फ गामा पांडुरंग भागानगरे (वय २४ वर्षे रा. पांचपीर चावडी, माळीवाडा) असे मयत युवकाचे नाव आहे. शुभम पाडोळे हा जखमी झाला आहे.
काल (सोमवारी) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर रूबाब कलेक्शन समोर ही घटना घडली. या प्रकरणी तिघांवर तोफखानाh पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार रमेश घोलप (रा. माणिक चौक) यांनी फिर्याद दिली आहे. गणेश केरुप्पा हुच्चे, नंदु बोराटे व संदिप गुडा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, मध्यरात्री फिल्मी स्टाईल घडलेल्या घटनेमुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. मयत ओंकार भागानगरे याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. ओंकार भागानगरे याच्या नातेवाईक व मित्रांनी रूग्णालयात गर्दी केली आहे. गणेश हुच्चे याचे कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे असून या धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून ओंकार भागानगरे याचा तलवारीने वार करून खुन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Leave a reply