दिशा शक्ती प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मोठा गौप्यस्फोट केला होता. आगामी काळात सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची महाविकास आघाडीची योजना होती. त्यासाठी सेनेचे आमदार पाडायचं ठरलं होतं, असा दावा बावनकुळे यांनी केला होता. बावनकुळे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, बावनकुळेंच्या या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी यांनी प्रतिक्रिया दिली. बावनकुळे ही सिरीयस पॉलिटिशियन आहेत, असं वाटायचं, पण हा माझा गैरसमज होता, तो आता दूर झाल्याचं त्या म्हणाल्या.
बावनकुळेंच्या वक्तव्याविषयी सुप्रिया सुळे यांनी विचारलं असता त्या म्हणाल्या की, बिचारे बावनकुळे…. रोज राष्ट्रवादीला नावं ठेवतात.. त्यांना राष्ट्रवादीला नावं ठेवल्याशिवाय दुसरं काही मिळतच नाही. मला वाटलं होतं, बावनकुळे हे एक सिरीयस पॉलिटिशियन आहेत. पण वेगळाच अनुभव त्यांच्या स्टेटमेंट वरून आला, माझा त्यांच्याविषयीचा गैरसमज दूर झाला, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.
नेमकं बावनकुळे काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंच्या प्रेमात होते. त्यांचा राष्ट्रवादीसोबत अलिखित करारनामा झाला होता. ते आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीसोबत कुठलीही तडजोड करायला तयार होते. २०२४ मध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री असं शिवसेना-राष्ट्रवादीचं ठरलं होतं. त्यासाठी राष्ट्रवादीचे 100 आमदार निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे आमदार पाडण्याचा ठाकरेंनी निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीकडून एक यादी तयार करण्यात तयार आली होीत. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पालकमंत्री होते, तिथं शिवसेनेचे आमदार पाडून शिवसेनेचं वर्चस्व कमी करायचं, आणि राष्ट्रवादीचं जाळं पसरवायचं, असा प्लॅन होता. रायगडच्या पालकमंत्र्यांनी तीन आमदार पाडण्याचा प्लॅन केला होता, असं बावनकुळे यांनी सांगितलं.दरम्यान, सुप्रिया सुळेंनी आता बावनकुळे हे गांभीर्याने घेण्यासारखे राजकारणी नाहीत, असं वक्तव्य केल्यानं त्यावर आता बावनकुळे काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.
Leave a reply