Disha Shakti

Uncategorized

शासन नियमानुसार सफाई कामगारांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या- राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष व्यंकटेसन

Spread the love

प्रतिनिधी / प्रमोद डफळ (अहमदनगर) दि. 12 जुलै – जिल्ह्यातील सफाई कामगारांना शासन नियमानुसार सर्व सोयी-सुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत. कामगारांना त्यांचे वेतन वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याच्यादृष्टीने काळजी घेण्याबरोबरच सर्व कामगारांना आरोग्याच्या सेवा मिळण्यासाठी सर्व सफाई कामगारांची ईएसआयसीमध्ये नोंदणी करण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय अध्यक्ष श्री व्यंकटेसन यांनी दिले.

जिल्ह्यातील कामगांराना देण्यात येणाऱ्या सुविधासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी आयोगाचे सदस्य पी.पी.व्हावा, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सहायक आयुक्त राधाकिसन देवढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आयोगाचे अध्यक्ष व्यंकटेसन म्हणाले, नियमित व कंत्राटी सफाई कामगारांना त्यांचे वेतन शासनाने विहित केलेल्या दरानुसार मिळणे आवश्यक आहे. कामगारांचे वेतन नियमानुसार त्यांच्या बँक खात्यामध्येच जमा करण्याबरोबरच या कामगांराच्या वेतनातुन भविष्य निर्वाह निधीची रक्कम दरमहा कपात होईल, यादृष्टीनेही आवश्यक ती काळजी घ्यावी. कामगारांना त्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांकही उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

कामगारांच्या आरोग्याच्यादृष्टीने त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी होणे आवश्यक असुन कामगारांना सुरक्षिततेच्यादृष्टीने गमबुट, हॅडग्लोज, साबण, मास्क, सॅनिटायजर, गणवेष आदी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

अध्यक्षांनी साधला सफाई कामगारांशी संवाद

आयोगाचे अध्यक्ष श्री व्यंकटेसन यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या कामगारांशी आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांच्याशी संवाद साधत आपणास दरमहा किती पगार मिळतो, सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक सर्व साहित्य मिळते काय, आपल्या आरोग्याची नियमितपणे तपासणी करण्यात येते का, किती तास काम करता आदी बाबींची माहिती त्यांनी यावेळी जाणुन घेतली.

जिल्हाधिकारी सिद्धाम सालीमठ म्हणाले की, सफाई कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधा संदर्भात आयोगामार्फत देण्यात आलेल्या सुचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येईल. प्रथम समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.
बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी, सफाई कामगार व कंत्राटदार उपस्थिती होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!