Disha Shakti

Uncategorized

कृषी यांत्रिकीकरण योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य

Spread the love

प्रतिनिधी / प्रमोद डफळ (अहमदनगर) दि. 12 जुलै – राज्याची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. बहुतांश लोकांचे जीवन शेतीशी निगडीत आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानुन शेतीचे उत्पादन वाढवत शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्यावर शासनाचा भर आहे. अहमदनगर जिल्ह्यात कृषी विभागाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातुन 2022-23 व 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 1 हजार 923 ट्रॅक्टर, 396 पॉवरटिलर व 10 हजार 35 कृषि औजारांसाठी शेतकऱ्यांना 7240.39 लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहमदनगर यांनी दिली आहे.

सन 2022-23 या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राकृवियो कृषी यांत्रिकीकरणांतर्गत 1 हजार 302 ट्रॅक्टर, 262 पॉवर टिलर तर 8 हजार 684 कृषी औजारांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना एकुण 5696.22 लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. तर सन 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राकृवियो कृषी यांत्रिकीकरणांतर्गत 621 ट्रॅक्टर, 134 पॉवर टिलर तर 1 हजार 621 कृषी औजारांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना एकुण 1544.17 लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना कृषि यंत्रसामुग्री, औजारे खरेदीस प्रोत्साहीत करणे व त्याद्वारे कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत कृषी यंत्र सामग्री व उपकरणे खरेदीसाठी अर्थसहाय्य तसेच भाडे तत्वावरील कृषी यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषी औजार बँक स्थापनेसाठी अर्थसहाय्य करण्यात येते.

योजनेच्या लाभासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलव्दारे अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत अर्जदाराची नोंदणी व आधार प्रमाणिकरण, वैयक्तिक तपशील, गटाची माहिती भरणे आवश्यक, अर्ज शुल्क भरणे, ऑनलाईन कागदपत्रे सादर करणे, औजारे प्रकार निश्चित करणे आवश्यक आहे. शासन स्तरावरून गुणवत्तेबाबत निकष निश्चिती करण्यात येऊन गुणवत्ता निकषाप्रमाणे लाभार्थ्याकडून खुल्या बाजारातुन खरेदी. लाभार्थ्याने औजारे खरेदीसाठी स्व-गुंतवणुकीची रक्कम त्याचे बँक खात्यामधुनच कंपनीला डी.डी,चेकद्वारे अनिवार्य आहे.

अनुदान मर्यादा अनु.जाती, अनु.जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी -५० टक्के व बहुभुधारक शेतकरी ४० टक्के. लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट अनुदान वर्ग करण्यात येते. नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, ७/१२, ८-अ, बँक पासबुक झेरॉक्स, आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!