प्रतिनिधी / रमेश खेमनर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किरीट सोमय्यांच्या प्रकरणात चौकशी करण्याची घोषणा करत कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. विधानपरिषेदत आज विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप करत एक पेन ड्राईव्ह सादर केला. दरम्यान हे व्हिडिओ पाहणे कठीण परीक्षा आहे, महिलेची तक्रार आली पाहिजे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी म्हटले.
अंबादास दानवेंचे सोमय्यांवर गंभीर आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत सोमय्या यांच्याबाबत एक पेन ड्राईव्ह सादर केला आहे. ‘जवळपास 8 तासांचे हे व्हिडिओ आहेत, एका महिलेने हिंमत करुन हे व्हिडिओ माझ्याकडे दिले आहेत, अनेक महिलांच्या मजबुरीचा फायदा घेण्यात आला आहे, या प्रकरणी चौकशी करावी,’ अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे.
‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर सोमय्या बोललेच; थेट फडणवीसांकडे केली ‘ही’ विनंती
चौकशांचा ससेमिरा मागे लावून विरोधी पक्षांतील नेत्यांना घाम फोडणारे भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ उठला आहे. या प्रकाराने सोमय्या चांगलेच अडचणीत आले असून राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
या प्रकारामुळे सोमय्या बॅकफूटवर गेले आहेत. यानंतर सोमय्या यांनी पुढे येत प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या म्हणाले, एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत असेही दावे केले जात आहेत.
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही. अशा सर्व आरोपांची व्हिडिओ क्लिप/क्लिप्स सत्यता तपासावी, चौकशीही करावी, अशी विनंती मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. सोमय्या यांनी स्वतःच ट्विट करत याबाबत माहिती दिली.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
भाजप नेते किरीट सोमय्या एका हॉटेलच्या रुममध्ये असल्याचं दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत एक महिलाही दिसून येत आहे. विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. किरीट सोमय्यांसारख्या बड्या राजकीय नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच यावर वेगवेगळ्या चर्चाही होत आहेत. हा व्हिडिओ ब्लर स्वरुपात एका वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आला आहे. त्यातील महिला कोण? याबाबत माहिती समोर आलेली नाही. परंतु या प्रकरणात विरोधकांकडून आता सोमय्यांना घेरण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकारावर सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकाराची चौकशी करण्याची विनंती त्यांनी गृहमंत्री फडणवीसांकडे केली आहे. आता या प्रकरणी देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Leave a reply