विशेष प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : भ्रमणध्वनीमुळे मजेशीर किस्सेही घडतात. असा किस्सा रावेर तालुक्यातील वनक्षेत्रातील गारबर्डी धरणाजवळ घडला. पाल येथील ग्रामीण रुग्णालयातील लग्न जमलेला तरुण कर्मचारी सुटी असल्यामुळे गारबर्डी धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी भावी पत्नीशी भ्रमणध्वनीवर बोलतांना तो इतका दंग झाला की, आपण जंगलात कधी शिरलो, हेही त्याच्या लक्षात आले नाही. त्याच्या सहकार्यांसह वनविभागाच्या कर्मचारी व ग्रामस्थांनी तब्बल सात तासानंतर त्याला शोधून आणले.
पाल ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचारी रविवारी सुटी असल्यामुळे गारबर्डी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यात लग्न जुळलेला एक तरुण कर्मचारीही होता. तेथे सर्व कर्मचारी गप्पागोष्टींमध्ये रंगले असताना, तरुण कर्मचार्याला भावी पत्नीने भ्रमण ध्वनीवरून संपर्क केला. त्यावेळी इतरांना त्रास नको म्हणून तो भ्रमणध्वनीवर बोलत बोलतच दुचाकीवरून निघाला. बोलता बोलता कुठे जात आहोत, याचे त्याला भानच राहिले नाही. तो एकटाच घनदाट जंगलात पोहचला. भानावर आला, त्यावेळी आपण कुठे पोहोचलो, हेही त्याला स्वतःला समजले नाही. तोपर्यंत अंधार झाला होता.
वनक्षेत्रात अस्वल, बिबटे, रानडुकरांसह इतर हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याने तो घाबरला. इकडे आपल्यासोबत असलेला कर्मचारी दिसत नसल्याने त्याच्या सहकारी कर्मचार्यांनाही काळजी वाटू लागली. त्यांनी इकडेतिकडे शोधाशोध केली. अंधार असल्यामुळे त्यांनीही शोधमोहीम थांबविली. त्यांनी पाल येथील ग्रामस्थांसह वनविभागाला या प्रकाराची माहिती दिली. तरुण कर्मचाऱ्याने भ्रमण ध्वनीवरून इतरांशी संपर्क साधला. मात्र, त्याला आपण कुठे आहोत, हे सांगता येत नव्हते.
काही ग्रामस्थांसह वनमजूर, वनरक्षक आदी २५ ते ३० जणांनी बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी रात्री वनक्षेत्रात मोहीम सुरू केली. त्यांनी वनविभागाकडे असलेल्या आधुनिक विजेरीच्या मदतीने शोध घेताना गारबर्डी धऱणाच्या पलीकडे असलेल्या नाल्यात जखमी अवस्थेत तरुण कर्मचारी मिळून आला. त्याला पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता तो कर्मचारी १५ दिवसांच्या रजेवर गेला असून, तो अमरावती येथील मूळ रहिवासी आहे. त्या कर्मचार्याची दुचाकी दुसर्या दिवशी सोमवारी दुपारी आदिवासी तरुणाने आणून दिली.
भावी पत्नीशी मोबाईलवर बोलता बोलता तरुण पोहचला थेट जंगलात आणि वाट चुकला, तब्बल सात तासानंतर…

0Share
Leave a reply