श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे : माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काल अखेर भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या हस्ते गळ्यात उपरणे घालत बीआरएसमध्ये अधिकृत प्रवेश केला.भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात राबविलेल्या शेतकरी योजनांची पाहणी करण्यासाठी तसेच माहिती घेण्यासाठी माजी आ. मुरकुटे 15 दिवसांपूर्वी तेलंगणाच्या दौर्यावर गेले होते. त्यांचे हैद्राबाद येथील मंत्रालयासमोरील तसेच भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासोबतची छायाचित्रे सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्याने ते बीआरएसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
माजी आ. मुरकुटे यांनी गंगापूरचे माजी आ. अण्णासाहेब माने, श्रीगोंद्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व नुकतेच बीआरएसमध्ये प्रवेश केलेले घनश्याम शेलार यांच्यासोबत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. माजी आ. माने व घनश्याम शेलार यांच्या पुढाकाराने ही भेट घेण्यात आली होती. त्यानंतर श्रीरामपूर येथील स्वयंवर मंगल कार्यालयात तेलंगणाचे खा. बी. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यापूर्वी खा. पाटील यांनी माजी आ. मुरकुटे यांच्या निवासस्थानी जाऊन स्नेहभोजन घेतले होते.
दोन दिवसांपूर्वी माजी आ. मुरकुटे अशोक कारखाना, अशोक बँकेचे संचालकासह 116 कार्यकर्त्यांना घेऊन तेलंगणाच्या अभ्यास दौर्यासाठी रवाना झाले. यात अशोक बँकेचे चेअरमन अॅड. सुभाष चौधरी, अशोक कारखान्याचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, संचालक भाऊसाहेब उंडे, विरेश गलांडे, ज्ञानेश्वर काळे, रामभाऊ कसार, माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, दिगंबर शिंदे, आदिनाथ झुराळे, बाबासाहेब आदिक, अच्युत बडाख, अशोक बँकेचे संचालक जितेंद्र तोरणे, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
काल माजी आ. मुरकुटे यांनी 116 कार्यकर्त्यांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते सत्कार स्विकारत बीआरएसमध्ये प्रवेश करून राजकीय धक्का दिला. काल शनिवार दि. 22 रोजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी बीआरएसचे नेते माजी आ. अण्णासाहेब माने पाटील, महाराष्ट्र किसान सेलचे अध्यक्ष माणिकराव कदम, पुणे विभाग समन्वयक बी. जे. देशमुख, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, घनश्याम शेलार, अब्दुल कादीर मौलाना, बंजारा समाजाचे नेते प्रल्हाद राठोड, आ. जीवन रेड्डी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व माजी आ. मुरकुटे यांच्यात चर्चा झाली. यादरम्यान महाराष्ट्रासाठी तेलंगणाच्या धर्तीवर काय करता येईल तसेच गोदावरी नदीवरील कालेश्वरम उपसा सिंचन योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गोदावरी खोर्यासाठी अशी योजना राबविता येईल का? यावरही सविस्तर चर्चा झाली.माजी आ. मुरकुटे यांनी यापूर्वी वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी करत तिन वेळा आमदार म्हणून तालुक्याचे नेतृत्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्ती होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेप्रसंगी ते सर्वप्रथम श्री. पवार यांच्यासोबत होते. नंतरच्या काळात त्यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी केली. त्यानंतर कोणत्याच पक्षात न राहता निवडणुका लढविताना सर्वच राजकीय पक्षांची मदत मिळू शकते असा कयास बांधून त्यांनी लोकसेवा विकास आघाडीची स्थापना केली. त्या माध्यमातून तालुक्यातील विविध निवडणुका लढवित होते.
आपली आघाडी म्हणजे रेल्वेचा डबा आहे, प्रसंगी तो कोणत्याही राजकीय पक्षाला जोडता येतो, असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. माजी आ.मुरकुटे हे दोनवेळा तेलंगणा दौर्यावर गेल्याने त्याच्या बीआरएस पक्ष प्रवेशाची चर्चा रंगली होती. अखेर ही चर्चा प्रत्यक्षात उतरवून माजी आ.मुरकुटे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा उडवून दिली आहे.
Leave a reply