प्रतिनिधी / रमेश खेमनर : भारतीय सैन्य दलाच्या दृष्टीने संवेदनशील असणारा दारुगोळा व स्फोटक पदार्थ अवैधरित्या ताब्यात बाळगणाऱ्या एका शेतकऱ्याला खारे कर्जुने येथून अटक करण्यात आली आहे. त्याने हा साठा घरातील आडगळी खाली लपवून ठेवला होता. नगर पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व पुण्यातील सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स विभाग यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. दिनकर त्रिंबक शेळके (वय ६५, रा. कर्जुने खारे, ता. नगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून १८ टॅन्क राऊंड, ५ मोटार राऊंड, ८ ऍ़म्युनेशन पिस्टल राऊंड, १६ पिस्टल राऊंड, ४० स्विचेस, लाल पिंवळी वायर बंडल व २५ किलो टीएनटी पावडर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही स्फोटके तो कोणाला विकणार होता? त्याचा पुढे काय उपयोग केला जाणार होता? याचा तपास सुरू आहे.
नगरजवळच्या के. के. रेंज मध्ये लष्कराचा युद्ध सराव चालतो. सरावानंतर तेथे पडलेले भंगार जमा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राट दिलेले असते. हे सर्व कामकाज लष्करी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालते. मात्र, परिसरातील गावातील काही लोक बेकायदेशीरपणे लष्करी हद्दीत प्रवेश करून हे साहित्य चोरून आणतात. त्यात फुटलेल्या आणि न फुटलेल्या स्फोटकांचाही समावेश असतो. भंगारातून पैसे मिळविण्याच्या उद्देशाने ही चोरी केली जाते. मात्र, यातील जिवंत तोफगोळे आणि त्यांची पावडर याला मोठी किंमत मिळते. याच स्फोटकांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता असल्याने लष्कराच्या गुप्तचर विभागाकडून यावर लक्ष ठेवले जाते. पोलिसही यावर लक्ष ठेवून असतात.
त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना खारे कर्जुने गावात एका ठिकाणी असा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पुण्यातील सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्सचे अधिकारी, नगरची दहशतवाद विरोधी शाखा, बीडीडीएस व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक यांनी संयुक्तपणे तेथे छापा घातला.
खारे कर्जुने गावात संशयित शेळके याच्या घरी पथक गेले. तेव्हा शेळके याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पथकाने घराची झडती घेतली. त्याच्या घरासमोर पत्र्याचे शेडमध्ये आडगळीच्या सामानाखाली दारुगोळा, स्फोटक पदार्थ व साधने ठेवल्याचे आढळून आले. १८ टॅन्क राऊंड, ५ मोटार राऊंड, ८ ऍ़म्युनेशन पिस्टल राऊंड, १६ पिस्टल राऊंड, ४० स्विचेस, लाल पिंवळी वायर बंडल व २५ किलो टीएनटी पावडर असा मुद्देमाल आढळून आला. तो जप्त करण्यात आला आणि आरोपी शेळके याला अटक करण्यात आली.
Leave a reply