Disha Shakti

राजकीय

टोलनाक्यावर अमित ठाकरेंची कार अडवली; संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी फोडला टोलनाका

Spread the love

दिशा शक्ती प्रतिनिधी /  गंगासागर पोकळे :  मनसे नेते आणि मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राज ठाकरे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमित ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. यावेळी नाशिकला असताना सिन्नर जवळ समृद्धी महामार्गावर अमित ठाकरे यांची कार टोलनाका कर्मचाऱ्यांनी अडवली. त्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला आहे. अमित ठाकरे या महामार्गावरून गेल्यानंतर हा प्रकार घडला.

मागील ३ दिवसांपासून अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नंदूरबार, धुळे, जळगाव याठिकाणी त्यांनी मेळावे घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अमित ठाकरेंचा ताफा मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी सिन्नरजवळील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अमित ठाकरेंची कार अडवण्यात आली. काही काळ अमित ठाकरेंना तिथे उभेदेखील राहावे लागले.

फास्टटॅगच्या तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाल्याची माहिती आहे. मात्र त्यानंतर अमित ठाकरे तिथून निघून गेले. पण मनसे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रागाच्या भावनेतून या टोलनाक्याची तोडफोड केली. २-३ वाहनांमधून मनसे कार्यकर्ते टोलनाक्याला दाखल झाले होते. त्यांनी टोलनाक्याच्या केबिनमधील काचा फोडल्या आणि त्याठिकाणाहून निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अद्याप या घटनेत कुणीही तक्रार केली नाही. परंतु पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!