Disha Shakti

इतर

येत्या दोन दिवसात जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा इशारा नदी काठावरील गावांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याची आवाहन

Spread the love

दिशा शक्ती न्यूज

प्रतिनिधी / प्रमोद डफळ : अहमदनगर दि. २४ जुलै जिल्‍हयात आजपर्यंत १२८.६ मि.मी. सरासरी पर्जन्‍याच्‍या २८.७० टक्के पाऊस झाला आहे. जिल्‍हयातून वाहणा-या प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणातून ५ हजार ५१५ क्यूसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्‍यमेश्‍वर धरणातून ५ हजार ५७६ व भिमा नदीवरील दौंड पुल येथून २८ हजार ६४२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच भारतीय हवामान खात्‍याने जिल्ह्यात २५ व २६ जुलै, २०२३ या कालावधीत वादळी वारा, मेघगर्जनेसह वीजा पडणे व मध्‍यम स्‍वरूपाच्‍या पर्जन्‍यमानाची शक्‍यता वर्तवली आहे. जिल्‍हयातील विविध धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रामध्‍ये पर्जन्‍यमान सुरु असून अतिवृष्‍टी झाल्‍यास धरणाव्‍दारे सोडण्‍यात येणा-या विसर्गामध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने नदीकाठावरील नागरीकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याची आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सखल भागात राहणा-या नागरीकांनी तातडीने सुरक्षीत स्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्‍यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्‍यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्‍यासाठी गर्दी करु नये. जुनाट,मोडकळीस आलेल्‍या व धोकादायक इमारतीमध्‍ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्‍टीमुळे भूस्‍खलन होण्‍याची व दरडी कोसळण्‍याची शक्‍यता असते. त्‍यादृष्‍टीने डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहणा-या लोकांनी दक्षता घ्‍यावी व वेळीच सुरक्षीत स्‍थळी स्‍थलांतर करावे. घाट रस्‍त्‍याने प्रवास करणे शक्‍यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्‍ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी. नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये उतरु नये. अचानक नदीच्‍या पाणीपातळीत वाढ झाल्‍यास जिवीतास धोका उदभवू शकतो.

धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्‍या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्‍यावा. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्‍वनी क्र.1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा, असेही पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!