धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : तालुक्यातील जागजी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या लता व्यंकट बंडगर यांची सोमवारी दि. २४ जुलै रोजी बिनविरोध निवड झाली.गावातील विरोधी गट असलेल्या शिवसेनेकडून सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला नाही. भाजपाच्या लता बंडगर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जागजीचे मंडळ अधिकारी श्री. अहिरे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर भाजपाच्या व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाके फोडून जल्लोष केला. त्यानंतर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी व भाजप, शिवसेनेच्या पदाधिकारयानी ग्रामदैवत ज्योतीबा, खंडोबा, महालक्ष्मीचे दर्शन घेतले.
सरकारी जागेवर अतिक्रमण करून घराचे बांधकाम केल्याप्रकरणी जागजी येथील सरपंच लक्ष्मण निवृत्ती बनसोडे यांच्यासह अन्य दोन सदस्य अपात्र ठरले होते. त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायतीत सध्या शिवसेनेकडे (ठाकरे गट) चार सदस्य तर भाजपाकडे पाच सदस्य तसेच शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे विद्यमान उपसरपंच वैजीनाथ सावंत हे एकमेव सदस्य आहेत. जागजी हे धाराशिव तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे. ग्रामपंचायतची सदस्य संख्या १३ आहे. शिवसेना खा. ओमराजे निंबाळकर यांचे आजोळ असल्याने व भाजपा आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे समर्थक, भाजपाचे युवानेते, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अॅड. दत्तात्रय देवळकर यांचे गाव असल्याने येथील सर्वच निवडणुका अत्यंत चुरशीच्या होतात. खासदारांचे मामा अप्पासाहेब पाटील व जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब पाटील यांच्या गटाची ग्रामपंचायतीत सत्ता होती.
शिवसेनेचे ८ सदस्य निवडून आले होते. भाजपाचे नेते अॅड. देवळकर व विजय हाऊळ यांच्या गटाचे ५ सदस्य आले होते. त्यावेळी सरपंच म्हणून लक्ष्मण बनसोडे तर उपसरपंच म्हणून वैजीनाथ सावंत निवडून आले होते. दरम्यान, जागजी येथील कृष्णा सावंत यांनी सरपंच व अन्य दोन सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करून घर बांधकाम केल्याची तक्रार जिल्हाधिकारी कडे केली होती. सुनावणीअंती जिल्हाधिकाऱ्यांनी पाच महिन्यापुर्वी शिवसेनेचे सरपंच लक्ष्मण बनसोडे व अन्य दोन सदस्य अपात्र ठरविले होते. राज्यात शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर उपसरपंच वैजीनाथ सावंत यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला.
सरपंचपद रिक्त असल्याने वैजीनाथ सावंत हे तीन महिन्यापासून सरपंच म्हणून कार्यरत होते. निवडणूक विभागाने जागजी येथील सरपंच पदाची निवडणूक जाहीर केली होती. ग्रामपंचायतीत भाजपाची पुन्हा सत्ता आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी जिपचे माजी सभापती अॅड. दत्तात्रय देवळकर, भाजप नेते विजय हाऊळ, माजी सरपंच विकास सावंत, माजी उपसरपंच भीमराव सावंत, कृष्णा सावंत, बालाजी देवळकर, बाजार समितीचे संचालक गोविंद लगाडे, ग्रापं सदस्य पांडुरंग सावंत, नितीन पौळ, अलका सावंत, अंजनाबाई सावतर, व्यंकट बंडगर, संभाजी सावतर, ग्रामपंचायत कर्मचारी लहू सावतर, महादेव मगर, सुभाष भांडवले आदींनी नूतन सरपंच लता बंडगर यांचे शाल व पुष्पहार घालून अभिनंदन केले.
निवडीवेळी चोख बंदोबस्त
राजकीयदृष्ट्या जागजी हे गाव संवेदनशिल असल्याने ढोकी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जगदिश राऊत यांनी सरपंच निवडीवेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस उपनिरिक्षक सुहास गवळी, पोहेकॉ श्री. शेळके, पोकॉ शिंदे, पोकॉ. शेळके, पोकॉ मदमुले, ग्रामविकास अधिकारी श्री. वाघे, तलाठी श्री. माळी, पोलीस पाटील सुभाष कदम-पाटील आदी उपस्थित होते.न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून निवड
जिल्हाधिकाऱ्यांनी जागजी येथील सरपंच व दोन सदस्य अपात्र केल्याप्रकरणी या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. निवडणूक विभागाने सरपंच पदाची निवडणूक जाहीर केली. पण उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून सोमवारी लता बंडगर यांची सरपंचपदी निवड झाली आहे. न्यायालयाचा जो निर्णय येईल तो, बंधनकारक असेल. दरम्यान, या प्रकरणी वादी व प्रतिवादींना उच्च न्यायालयाचे समन्स आले आहेत.
Leave a reply