राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील उंबरे येथे बुधवार 26 जुलै रोजी रात्री एका नाजूक कारणावरुन एका गटाने दुसर्या गटावर हल्ला करत तोडफोड, दगडफेक करत मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे उंबरे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन दंगल करणार्या अनेक तरुणांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथे बुधवारी एका नाजूक कारणावरुन दुपारपासून दोन गटांत हमरीतुमरी चालू होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी 100 ते 150 जणांच्या एका गटाने दुसर्या गटावर हल्ला करून दगडफेक करत तोडफोड केली. तसेच काही तरूणांना बेदम मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस पथकाने रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करून दंगल करणार्या दहा तरुणांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले.सध्या उंबरे परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याने त्याठिकाणी छावणीचे स्वरूप आले आहे. तर उंबरे गावात तणाव आहे. उंबरे येथे झालेल्या मारहाणीत तीन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना अहमदनगर व पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
याबाबत सलीम वजीर पठाण रा. उंबरे यांच्या फिर्यादीवरून 25 जणांविरोधात गुन्हा नोंदविला असून आरोपी राजेंद्र रायभान मोहिते (वय 25) रा. गणेशवाडी ता. नेवासा, गणेश अशोक सोनवणे (वय 21) रा. श्रीरामवाडी (सोनई) ता. नेवासा, शेखर बाळासाहेब दरंदले (वय 30) रा. त्रिमुखे थिएटर सोनई ता. नेवासा, सचिन विजय बुर्हाडे (वय 25) रा. शिवाजी चौक राहुरी, नवनाथ भागीनाथ दंडवते (वय 36) रा. ब्राम्हणी ता. राहुरी, संदिप भाऊसाहेब लांडे (वय 32) रा. लांडेवाडी ता. नेवासा, शुभम संजय देवरे (वय 25) रा. स्टेशन रोड राहुरी, सुनिल उत्तम दाभाडे (वय 26) रा. क्रांतीचौक कातोरे गल्ली राहुरी, मारुती बाळासाहेब पवार (वय 22) रा. निंभारी ता. नेवासा, प्रतिक प्रकाश धनवटे (वय 29) रा. तनपुरे गल्ली, राहुरी. या दहा जणांना अटक केली असून 15 जण पसार झाले आहेत. पोलीस पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटने बाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 817/2023 भादंवि कलम 295, 295 (अ), 143, 147, 148, 149, 427 क्रिमीनल लॉ अमेंटमेंट 2013 चे कलम 7 सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37, (1), (3), 135 प्रमाणे दंगल, मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले.
पकडलेल्या आरोपींना राहुरी येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसर्या फिर्यादीत म्हटले, आरोपी अलीशा निसार शेख रा. उंबरे हिने रमजान सणाच्या दिवशी सेल्फी फोटो काढायला लावून, आरोपी आवेज निसार शेख याने फिर्यादीच्या फोटोचा वापर करून इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडून त्यावरून फिर्यादी यांचेशी चॅटींग करीत आहे, असे भासवून फोनद्वारे, मेसेजद्वारे व प्रत्यक्ष भेटून फिर्यादीचे फोटो व चॅट सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून ‘तू मला आवडतेस, तू माझ्याबरोबर पळून चल’, असे म्हणून फिर्यादीचा विनयभंग केला.
पीडितेच्या फिर्यादीवरून अलिशा निसार शेख व आवेज निसार शेख दोघेही रा. उंबरे ता. राहुरी यांच्या विरोधात भादंवि 354 (ड), 506, 34 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस बंदोबस्तात वाढ
बुधवारी रात्री दहा वाजल्यापासून तर पहाटे चार वाजेपर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी बसवराज शिवपुंजे, पोलीस निरिक्षक धनंजय जाधव, नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील, राजेंद्र लोखंडे, नगर येथील आरसीपी अधिकारी, नगर, श्रीरामपूर, राहुरी येथील तसेच एसआरपी जवानासंह शंभर पोलिसांचा फौजफाटा रात्रभर प्रत्येक गल्ली न गल्ली पिंजून काढत होते. रात्री काही टुकार फिरणार्यांना पोलिसांकडून चांगलाच प्रसाद मिळाला आहे. सध्या उंबरे गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून दोन दिवसांवर मोहरम येऊन ठेपल्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
Leave a reply