Disha Shakti

इतर

जगण्यासाठी सिलिंडर लावला, अन् ऑक्सिजनच नाही ; शासकीय रुग्णालयाचा गलथान कारभार..

Spread the love

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : संकटाच्या मालिकेत अडकलेल्या गर्भवतीला येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही दिलासा मिळाला नाही. दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकीचा मृत्यू झाला. दुसरी मुलगी एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आली. तिथे मुलीला ऑक्सिजनची गरज पडली. रविवारी मामाने सहज ऑक्सिजन सिलिंडर तपासला असता रिकामे सिलिंडर लावून असल्याचे आढळून आले. या धक्कादायक प्रकारानंतर मामा भाचीला घेऊन थेट खासगी रुग्णालयात निघून गेला.

मनीषा प्रशांत चव्हाण (वय २४) रा. कारेगाव यावली ही महिला २२ जुलै रोजी प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात आली. तिला रुग्णालयात येताना पुराचा सामना करावा लागला. कुटुंबीयांनी खाटेवर झोपवून तीन किलोमीटर पायपीट करत यवतमाळचे शासकीय रुग्णालय गाठले. २२ जुलै रोजी मनीषाची प्रसूती झाली. तिने दोन गोंडस मुलींना जन्म दिला. पुरावर मात करत मनीषाला रुग्णालयात आणले होते. मात्र, येथेही काळाने तिचा पिच्छा सोडला नाही. एका मुलीचा प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिला रुग्णालयातील वाॅर्ड क्र. ३६ (फेज-३) या बालरोग विभागात दाखल करण्यात आले.

मुलीची प्रकृती तपासून तिच्यावर एनआयसीयूमध्ये उपचार सुरू झाले. डाॅक्टरांनी ऑक्सिजन लावण्याचे निर्देश दिले. त्यावरून ऑक्सिजन लावण्यात आले. मात्र, मुलीच्या प्रकृतीत विशेष सुधारणा होत नसल्याचे आढळून आले. आठवडा उलटला तरी फारसा बदल दिसला नाही.

यामुळे मामा अनिल राठोड याने रविवारी (दि.३० जुलै) आयसीयूमधील ऑक्सिजन सिलिंडर तपासले. तेव्हा तेथील तीन सिलिंडरमध्ये ऑक्सिजन नसल्याचे आढळून आले. हा प्रकार त्याने कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला सांगितला. तरीही सिलिंडर उपलब्ध होऊ शकले नाही. अखेर खासगी रुग्णवाहिका चालकाने सिलिंडर उपलब्ध करून दिला. त्यामुळे मुलीला पुन्हा ऑक्सिजन मिळाले. हा गलथान कारभार पाहून मुलीवर शासकीय बालरोग विभागात उपचार करणे धोक्याचे आहे, हे लक्षात आले. चव्हाण कुटुंबीयांनी मुलीला खासगी रुग्णालयात दाखल केले.

बालरोग विभागात कुणाचा कुणाला पायपोस नाही. सिलिंडरमध्ये ऑक्सिजन नसतानाही लहान बाळांना नळ्या लावून ठेवले जाते. हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतरही यंत्रणा हलली नाही. तीन बाळांना एनआयसीयूमध्ये ऑक्सिजनवर ठेवले होते. येथील व्यवस्था बघितली जात नाही. चालढकल होत आहे. या प्रकाराची अद्याप तक्रार केलेली नाही. भाचीचा जीव वाचविणे महत्त्वाचे वाटले.
– अनिल राठोड रा. मोहदा (बाळाचा मामा)

सेंट्रल ऑक्सिजन प्रणाली

सर्व वार्डात सेंट्रल प्रणालीतून ऑक्सिजन पुरवठा होतो. ज्या बाळाबद्दल तक्रार आहे, त्यांना बाळाला खासगी रुग्णालयात हलवायचे होते. तेथे नेण्यासाठी सिलिंडर मागितला दात होता. त्या बाळाचीही प्रकृती उत्तम आहे. सिलिंडरमुळे धोका असा कुठलाही प्रकार नाही, असे प्रभारी अधीक्षक डॉ. अजय कुसुंबिवाल यांनी सांगितले.

बदल्यांमुळे विस्कटली प्रशासकीय घडी

शासकीय रुग्णालयातील अनेक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. यामुळे सर्वच विभागात अतिरिक्त कामाचा ताण आहे.

नर्सेस व तंत्रज्ञ यांचीही पदे रिक्त आहे. यामुळे एकूणच महाविद्यालय व रुग्णालयाची प्रशासकीय घडी विस्कटली आहे. त्यात काहींचे दुर्लक्ष असल्याने असे प्रकार घडत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!