विशेष प्रतिनिधी /इनायत आत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार तरूणांना शेळी आणी कबुतर चोरी केल्याच्या संशयावरून झाडाला उलटं बांधून अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या शुभम माघाडेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील एका आरोपीला पोलीसांनी जेरबंद केलं आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील नानासाहेब गलांडे यांची काही दिवसापूर्वी शेळी आणि काही कबुतर चोरीला गेले होते.. या चोरीच्या संशयावरून शुक्रवारी सकाळी चार तरूणांना त्यांच्या घरातून बळजबरी एका शेतात नेण्यात आलं.. यानंतर कपडे काढून त्यांना झाडाला उलटं लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
केवळ चोरी केल्याच्या संशयावरून अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार यांना दिला कोणी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जखमी तरूणांना श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून आरोपींना अटक केली जावी अशी मागणी केली जात आहे. आरोपी युवराज गलांडे , नानासाहेब गलांडे, राजू बोरगे , राजेंद्र पारखे, मनोज बोडखे आणि दुर्गेश वैद्य यांनी निर्दयीपणे या तरूणांना मारहाण केली. तरूणाची आई जेव्हा मारहाण न करण्याची विनंती करायला गेली तेव्हा तिलाही धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आलं, असा आरोप जखमी तरुणाच्या आईने केला.
या धक्कादायक घटनेनंतर या प्रकरणी शुभम माघाडे याच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात भादवी कलम 307, 364, 342, 506, 504, 147, 148, 149 सह क अ.जा.अ.ज.1989 कलम 3(1) (a) (d) , 3(2) (v-a) , 3(I)(r)(s) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच एका आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिली.दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात जात मारहाण झालेल्या तरुणांची भेट घेतली.
यावेळी रूग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले असून अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशाप्रकारे कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासन विखे पाटील यांनी दिले.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे कबुतर चोरीच्या संशयावरून चार मुलांना अमानुष मारहाण

0Share
Leave a reply