धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : जन्मतः गतिमंद असलेल्या अनाथ मुलींना सोलापुरच्या किसान कन्स्ट्रक्शनने मायेची सावली उपलब्ध करुन दिली आहे. गतीमंदत्वामुळे जन्मदाते, आप्तेष्ट आणि नातेवाईकांनी उघड्यावर सोडून दिलेल्या स्वआधार मतिमंद निवासी बालगृहात रविवारी मायेची सावली सभामंडपाचे लोकार्पण सोलापूरचे विजयभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
धाराशिव शहारानजिक असलेल्या विमानतळ रोडवरील आळणी शिवारात रविवारी सकाळी सभामंडपाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. अभय शहापुरकर, श्रीमती मंजुलाबेन रमेशभाई पटेल, इंदिराबेन विजयभाई पटेल, ज्येष्ठ पत्रकार अनंत आडसुळ, रवींद्र केसकर, शहाजी चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रकल्पातील अनाथ, निराधार मतिमंद मुलींसाठी सोलापूर येथील किसान कन्स्ट्रक्शनच्या वतीने ४४ बाय ७० फूट आकाराचा गोलाकार भव्य सभामंडप बांधून दिला आहे. रविवारी मोठ्या उत्साहपूर्ण कार्यक्रमात या सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही संस्था मुलींच्या संगोपनासाठी मोठ्या तळमळीने काम करीत आहे. त्यामुळेच आम्ही सर्वजण या संस्थेशी जोडले गेलो आहोत. भविष्यातही या अनाथ गतिमंद मुलींसाठी आमही सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची भावना किसान कन्स्ट्रक्शनचे जयेशभाई पटेल यांनी यावेळी बोलून दाखविली. .
उद्योजक इंदरमल जैन यांना प्रकल्पातील मुलींनी अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रारंभी केतन वोरा, अनिल जैन यांच्यासह सोलापूर येथून आलेल्या मान्यवरांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सुरुवातीला संस्थाप्रमुख शहाजी चव्हाण यांनी प्रास्ताविकपर मनोगत मांडले, केसकर, आडसुळ आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शहापुरकर यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रुपाली कांबळे यांनी तर आभार अश्रूबा कोठावळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना परिश्रम घेतले.
Leave a reply