धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी बालगृहामध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून एक अनोखा उपक्रम म्हणून स्वआधार पार्लरचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी माननीय मा.श्रीमती.अंजू एस. शेंडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव,मा. श्री. आर. एस. गुप्ता जिल्हा व सत्र न्यायाधीश -1,मा. श्रीमती. मंजू बदाणे प्रमुख न्यायदंडाधिकारी धाराशिव, मा.श्रीमती. कोठावळे प्रमुख न्यायाधीश बालन्याय मंडळ धाराशिव, तसेच संस्थेचे सचिव माननीय श्री शहाजी चव्हाण , मुख्याध्यापक मा.श्री थोडसरे , बालगृहातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बालगृहातील सर्व मुली उपस्थित होते.
स्वआधार पार्लरचे उद्घाटन अंजू शेंडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सर्व मान्यवरांनी बालगृहातील रोपवाटिकेचा प्रकल्प लाकडी तेल घाण्याचा प्रकल्प तसेच कला विभागामध्ये मुलींनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या पर्यावरण पूरक मातीच्या गणेश मूर्ती विविध झाडांच्या बियांपासून बनवलेल्या पर्यावरण पूरक राख्या टाकाऊ वस्तु पासून बनवलेल्या टिकाऊ वस्तू, व सर्व वर्ग खोल्यांची पाहणी करून मुलींचे कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर बालगृहातील मुलींच्या हस्ते शेणाच्या पणत्यांपासून नैसर्गिक रित्या बनवलेले बुके देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
संस्थेबद्दल माहिती सांगताना श्री. शहाजी चव्हाण सर यांनी स्वआधार पार्लर हा अनोखा उपक्रम सुरू करण्यामागे वय वर्षे 18 च्या पुढील मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करणे हा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. बालगृहामध्ये 113 मुली निवासी स्वरूपात वास्तव्यास आहेत. या मुलींसाठी बाहेरून न्हावी बोलवून त्यांची कटिंग करणे किंवा इतर बाबींमध्ये अनेक अडचणी येत होत्या. यासाठी सर्व सोयी सुविधांनी युक्त असे वातानुकूलित स्वआधार पार्लरचे उदघाटन करून या मुलींना सर्व सुविधा पुरवणे हा ही या मागचा एक उद्देश होता. गेली एक ते दीड वर्षापासून प्रशिक्षित शिक्षकांच्या निरीक्षणाखाली बालगृहातील मुलींना पार्लरमधील सर्व बाबींचे प्रशिक्षण देण्याचे काम चालू होते.
श्रीमती. अंजू एस. शेंडे यांनी मार्गदर्शन करताना या निरागस बालकांची सेवा करताना निस्वार्थपणे सेवा दिली तर त्याचे चांगले फळ आपल्या सगळ्यांना निश्चितच मिळेल असे सांगितले.तसेच शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षणातून आनंद मिळावा असे आनंददायी शिक्षण बालकांसाठी दिले पाहिजे असे देखील त्यांनी सांगितले.
यानंतर श्रीमती मंजू बदाने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना येथे आल्यानंतर भावुक झाल्यामुळे बोलण्यासाठी शब्द सापडत नाहीत असे व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी बालगृहातील मुलींनी गीत गायन व महाराष्ट्राची लोकप्रिय लोककला लावणी सादर करून मान्यवरांची मने जिंकली. खरा तो एकची धर्म या प्रार्थना पर गीतावर नृत्य सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कोठावळे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचे आभार श्रीमती रूपाली कांबळे यांनी व्यक्त केले.
Leave a reply