प्रतिनिधी / जितू शिंदे : मुद्रा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले कर्ज प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत या मागणीसाठी बेरोजगार तरुण जलसमाधी आंदोलन करण्यासाठी वैजापुरच्या नारंगी तलावात उतरले होते. मुद्रा योजनेअंतर्गत वैजापूरच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मोंढा शाखेत मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या डेअरी कर्जांचे प्रस्ताव तातडीने निकालात काढावेत या मागणीसाठी तालुक्यातील चोरवाघलगाव, आघूर, जानेफळ, रोटेगाव सह ग्रामीण भागातील जवळपास दहा ते पंधरा तरुणांनी रविवारी शहराजवळच्या नारंगी धरणात जलसमाधी आंदोलन केले.
वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे व बँकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. येत्या तीन दिवसात याबाबत कार्यवाही करू असे सकारात्मक लेखी आश्वासन बँकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन कर्त्यांना दिले. रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. ग्रामीण भागातील अनेक बेरोजगार तरुणांनी वैजापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मोंढा शाखेत मुद्रा योजने अंतर्गत डेअरी लोनचे प्रस्ताव दाखल केले आहेत.
हे प्रस्ताव दाखल करतांना विम्याचे तीस हजार रुपये व फाईल खर्च वीस हजार रुपये असे तब्बल पन्नास हजार रुपये सावकारी कर्ज घेऊन व दागिने गहाण ठेवून शेतकऱ्यांनी भरले आहेत. मात्र फाईल मंजुरी होऊनही बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना अद्याप कर्ज मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत असे निवेदन परसराम मोईन, कुणाल चव्हाण, आबासाहेब बुट्टे सुनील काळे, रमेश कापसे, निळकंठ काळे, अविनाश शिंदे, रोशन शिंदे, पप्पू खोकले, विशाल डुबे, सोनू बंगाळ, वरूण राजपूत, भरत राजपूत, विजय मोरे, आकाश शेळके यांनी दिले होते. मात्र कार्यवाही न झाल्याने हे आंदोलन केले.
वैजापुरात तरुणांचे जलसमाधी आंदोलन ; तीन दिवसांत कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन

0Share
Leave a reply