Disha Shakti

इतर

अर्लट काही थांबेना, पाऊस मात्र येईना; बळीराजाचं काळीजच अर्लट मोडवर !

Spread the love

विषेश प्रतिनिधी / वसंत रांधवण : आज अमुक भागात रेड अलर्ट तर तमुक भागात ऑरेंज अलर्ट घोषित, काही ठिकाणी अति जोरदार ते अति मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे, अशा सततच्या येणाऱ्या हवामान अंदाजामुळे बळीराजाच्या आशा रोजच पल्लवीत होत आहेत. मात्र ‘पाऊस तर काय येईना अन अलर्ट देण्याचे थांबेना.., अशा परिस्थितीत बळीराजाचं काळीजच पावसाअभावी अलर्ट मोडवर आल्याचे चित्र सध्या पारनेर, पाथर्डी, शेवगाव,नेवासा या तालुक्यात दिसत आहे.

जून महिना सुरू झाला आणि मागील सारे झाले गेले विसरून बळीराजा पुन्हा एकदा नव्या जोमाने खरिपाच्या तयारीला लागला होता. जूनमध्ये एक-दोन दिवस आलेल्या रिमझिम पावसानं यंदाचा पावसाळा चांगला राहील. अशा आशेवर बळीराजांना खरिपाची शंभर टक्के पेरणी करून टाकली. सोयाबीन, कपाशी, बाजरी, तुर, उडीद, मूग आदींसह नगदी पिकांची खरिपात बळीराजांना पेरणी, लागवड केली होती. मात्र जून असा तसा कोरडाच गेला. जुलै पूर्ण कोरडा गेला. त्या पाठोपाठ ऑगस्टही गेला. मात्र पाऊस काय आला नाही. आकाशातलं ढगही हटले नाहीत.

रोज ढगाळ वातावरण, पावसाचे चिन्ह आणि हवामान तज्ञांकडून येणारे रोजचे अंदाज ऐकत अखेर सप्टेंबरचा मध्य आला तरी नेवासा तालुक्यात चिंब भिजणारा पाऊस आलाच नाही. पेरलेली खरिपाची सगळी पिकं करपून गेली. ऑगस्ट महिन्यातील ढगाळ वातावरण आणि प्रखर ऊन यामुळे पिकांवर रोगांचाही प्रादुर्भाव झाला. फवारे मारत पिकं कशीबशी जगवण्यासाठी बळीराजा आटापिटा करत असताना मात्र आता पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.

पावसाळ्यातच पडणाऱ्या उन्हाळ्यासारख्या ऊन पिकांना मारक ठरत आहे. शेकडे हेक्टर पिक जळून गेली आहे. काही ठिकाणी पीक करपली तर काही ठिकाणी रोगांमुळे पीकांची वाढ खुंटली आहे.
यंदा जोरदार पाऊस होणार आहे. दुष्काळ पडणार नाही. असे तज्ञांकडून येणारे सोशल मीडियावरील मेसेज वाचून बळीराजा मनातल्या मनात सुखावत होता. मात्र गेली तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीतील पाणीही संपत आलं असुन अनेक ठिकाणी बोओरवेल विहीरी कोरडे पडले आहेत. पारनेर तालुक्यातील टाकळीढोकश्वर, कान्हुरपठार, ढवळपुरी, वनकुटे,खडकवाडी, पळशी वासुंदे, सावरगाव, काळेवाडी, शिंदेवाडी, कन्हेर,वरणवाडी, गुरेवाडी, कासारे, कर्जुले हर्या, पिंपळगावरोठा, तिखोल बहिरोबाचीवाडी, किंन्ही, करंदी, भाळवणी, जामगाव, वडगाव सावताळ ढोकी, धोत्रे आदी गावांमध्ये पावसाने पूर्णतः दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असुन बळीराजा चिंतेत आहे.

या परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांनी पीक विमा भरले आहेत. ऑनलाईन ई पीक पहाणी नोंदणी केली आहे. मात्र आता शासनाने या परिसरात कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने आधार देण्याची गरज शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर पावसाविषयी असणारे दररोजचे अपडेट सोशल मीडियावर देताना पुर्ण खात्री होणे गरजेचे असल्याचे मत बळीराजा कडून व्यक्त होत आहे. निघोज परिसरातील काही भागांमध्ये कालव्याचे पाणी आल्याने निदान पिण्याचा पाण्याचा प्रश्न तरी आता महिनाभरासाठी का होईना मार्गे लागणार आहे. मात्र कालव्याचे आवर्तन बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह आबालवृद्धांची पळापळ सुरू होणार आहे.

तीन महिने कोरडे गेल्यानंतर आता बळीराजाला आस लागली आहे ती श्रीगणेशकृपेची …! उद्यापासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सव काळात श्री‌. गणेशाची कृपा होऊन भरभरून पाऊस झाल्यास निदान आता रब्बी तरी साधेल अशी आशा बळीराजाला आहे. त्यामुळे बळीराजाने आता श्री. गणेशाचा धावा सुरू केला आहे. गणेशोत्सव काळात भरपूर पाऊस पडू दे…! अशी आर्त विनवणी गणपती बाप्पाला बळीराजाने केली आहे.

हवामान तज्ञांकडून येणारे अंदाज हे या परिसरात पूर्णतः फेल गेले आहेत. सोशल मीडियावर येणाऱ्या अंदाजानुसार आम्ही शेतीचे नियोजन करत होतो. मात्र यावर्षी सर्वच अंदाज सपशेल फोल ठरल्याने आमचे पीकही वाया जाणार आहेत. त्यामुळे शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून पिक विमा तातडीने द्यावा. बदलत्या वातावरणामुळे अंदाजावर आता किती भरोसा ठेवायचा हेच कळायला मार्ग नाही.

– बापूसाहेब शिर्के(

उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर )


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!