Disha Shakti

राजकीय

ढवळपुरीत भर कार्यक्रमात भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये हमरी तुमरी !

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण (पारनेर) : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून ढवळपुरी ते गावडेवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कामासाठी ६ कोटी ४१ लाख रूपये मंजूर झाले. कामाचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी होता. परंतु कार्यक्रमादरम्यान भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे व ढवळपुरीचे उपसरपंच बबनराव पवार यांच्याच विकास कामे व निधीच्या श्रेयावरून तू तू मैं मैंं झाल्याने याची चर्चा पारनेर तालुक्यात व सोशल मीडियावर रंगली आहे. गेल्या अनेक दिवसापासून भाजप नेते सुजित झावरे यांना खासदार विखे समर्थक व भाजप पदाधिकारी अनेक विकास कामे व पक्ष कार्यक्रमात टाळत आहेत.

या वादाला ही किनार असल्याचीही चर्चा आहे. उपसरपंच बबनराव पवार सुजित झावरे यांचे समर्थक असून ढवळपुरी येथे अनेक वर्षापासून ते काम करत आहेत. पारनेर तालुयातील भाजपमध्ये वाढत चाललेली गटबाजी व झावरे समर्थकांची खदखद या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. ढवळपुरी येथे रस्ता भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे व ढवळपुरीचे उपसरपंच बबनराव पवार यांच्यात हमरीतुमरी झाली. 

पवार यांनी बोलताना सुजित झावरे यांचे नाव घेताच कोरडे यांचा पारा चढला. ‘कोणाचे नाव घेऊ नका, पक्षाचे नाव घ्या’ असे कोरडे यांनी सांगताच पवार यांनी कोरडे यांना धारेवर धरले.ढवळपुरी ते गावडेवाडी या ६ कोटी ४१ लाख रूपये खर्चाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाचे भूमिपूजन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते, खा. डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत आयोजित केले होते. मात्र विखे पितापूत्र या कार्यक्रमास उपस्थित राहू न शकल्याने कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष विकास रोहोकले, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात आदी पदाधिकाऱ्यांनी भूमिपूजन आटोपून घेतले.

भूमिपूजनानंतर उपसरपंच या नात्याने बबनराव पवार यांनी माध्यमांना विकास कामांबाबत प्रतिक्रिया द्यावी, असे सुचविले. पवार यांच्या तोंडून सुजित झावरे यांचे नाव येताच कोरडे यांचा संताप अनावर झाला. तेथूनच गोंधळ सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनीही संताप व्यक्त केला. त्यानंतर कोरडे यांच्यासह इतर पारनेरकडे रवाना झाले. बबनराव पवार म्हणाले,सन २००२ चा काळ मला आठवला. मी सरपंच असताना त्यावेळी स्व. बाळासाहेब विखे पाटील खासदार तर स्व. वसंतराव झावरे पाटील आमदार होते. तात्कालिक खासदार व आमदार यांनी आम्हाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ढवळपुरी ते लालूचा तांडा हा ७ किलोमीटरचा रस्ता दिला. ढवळपुरी ते गावडेवाडी हा सहा किलोमीटर अंतराचा रस्ताही त्यांनी दिला.

आमदार स्व. वसंतराव झावरे यांनी काळुचा प्रकल्प दिला. आम्हाला विजेचे सबस्टेशन नव्हते, सुजित पाटलांनी सबस्टेशन दिले. सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुजय विखे यांची भेट घेतली असता त्यांनी ६ कोटी ४१ लाखांचा निधी दिला. खासदार सुजय विखे पाटीलांची मोठी कामे आहेत. विखे व झावरे घराण्याने ढवळपुरी गावचे नंदनवन केले. कोंडीबाची ठाकरवाडी व सुतारवाडी येथे दोन शाळा खोल्याही दिल्या आहेत. वयोश्री योजनेमध्ये सर्वाधिक फायदा ढवळपुरीला झाला.

सुजित झावरे यांचे वारंवार नाव येऊ लागल्यानंतर हा भाजपचा कार्यक्रम आहे, तुम्ही कोणाचेही नावे कसे घेता,असा सवाल करीत कोरडे यांनी तुम्ही हे थांबवा,बोलू नका, मला बोलू द्या, तुझं भाषण बंद कर असे म्हटले. उपस्थित ग्रामस्थांमधून पवार यांचे काही चुकले नाही, त्यांना बोलू द्या, पक्षाविषयी बोलायचे हे मान्य परंतु कोणाचेही नाव का घ्यायचं नाही? प्रत्येकाला पक्ष असतो ज्याने कामे केली,त्यांचा नामोल्लेख करायला नको का असा प्रश्न उपस्थित केला. पवार हे बोलत असतानाच कोरडे त्यांच्यासमोर येऊन बोलू लागले. त्यावर सुजित झावरे यांचे नाव घेतल्यावर तुम्हाला एवढे दुःख होत असेल, तुम्हाला पक्षाला मोठे करायचे असेल तर लोक जमवावे लागतील, सर्वांना एकत्र घ्यावे लागेल तेव्हाच तालुक्यात पक्ष मोठा होईल. पक्ष देशात मोठा आहे.

तालुक्यात मोठा करायचा असेल तर तुम्ही तुमचे वैयक्तिक सुजित पाटलांविषयी काय असेल ते मनातून काढून टाका, एकत्र येऊन सुजय विखे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. तरच त्यांचे दोन्ही हात बळकट होतील, अशी भूमिका मांडली. त्यावर पाहून घोतो बघून घेतो असे कोरडे म्हणाले. तुम्ही काय बघून घेणार? तुम्हाला काय बघून घ्यायचं असेल ते बघून घ्या, मलाही पवार म्हणतात, असे सांगत पवार यांनीही कोरडे यांना प्रतिआव्हान दिले.

दोन्ही नाथांचा या कामाशी संबंध नाही

हा रस्ता खासदार डॉ. सुजय विखे यांना मी सुचविला होता. त्यानुसार मंजुरी मिळून हे काम सुरू झाले आहे. या रस्त्याशी दोन्ही नाथांचा (दाते – कोरडे ) काहीही संबंध नाही. सरपंच पवार सर हे झावरे परिवाराचे निष्ठावंत आहेत. झावरे परिवाराने या गटासाठी केलेल्या कामांच्या योगदानाबद्दल ते माहीत देत होते. परंतु ते कोरडे यांना सहन झाले नाही. पवार यांच्यासारख्या वयस्कर व्यक्तीशी त्यांनी अरेरावी केली. हा पारनेर तालुका आहे, संयमी आहे. परंतु अती केल्यानंतर जनतेचा संयम सुटला तर काहीही होऊ शकते.
– सुजित झावरे पाटील
( माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अ.नगर )


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!